शेवगाव (प्रतिनिधी) : रेणुका प्रॉडक्शनचे प्रमुख, देशातील नऊ राज्यात १०७ शाखा असणाऱ्या श्री रेणुकामाता मल्टीस्टेटचे ज्येष्ठ संचालक योगेश चंद्रकांत भालेराव ( वय ३७ ) यांचे आज शुक्रवारी पहाटे हदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले .
आर्थिक क्षेत्राचे जाणकार असलेले कै . योगेश प्रकृतीने अत्यंत सुदृढ होते. व्यायाम त्यांचा छंद होता . तसेच ते अत्यंत धार्मिक होते . दातृत्व त्यांचा स्थायी भाव होता. आपल्या वडिलोपार्जित शेतजमीनीत श्री रेणुकामातेचे मोठे आकर्षक मंदिर उभारून अमरापूरचे देवस्थान नावारूपाला आणण्यात तसेच श्री रेणुकामाता मल्टिस्टेटच्या मोठ्या विस्तारात त्यांचा सिंहांचा वाटा आहे.
या देवस्थानच्या नवरात्रोत्सवासाठी थेट माहूरहून ते दरवर्षी पायी ज्योत आणत असत. त्यात गेल्या तेरा वर्षात कधीही खंड पडला नव्हता. रेणुकामाते वरील श्रध्देपोटी त्यांनी चार वर्षापूर्वी ‘ माझी रेणुका माऊली ‘ ही मालिका सामटिव्हीवर प्रदर्शित केली होती. तीचा चित्रपट करण्याचा त्यांचा मनोदय अकाली निधनामुळे मात्र अधूरा राहिला .
त्यांचे मागे आई मंगलताई, पत्नी योगिता, मुलगा रुद्र व मुलगी टिनू ही लहान मुले, श्री रेणुकामाता मल्टिस्टेटचे संस्थापक प्रशांत भालेराव उर्फ नाना, विधिज्ञ नितीन हे दोन बंधू, वहिनी जयंती व पुतणे प्रद्युम्न व रेणुका असा परिवार आहे . त्यांचे पार्थिवावर नगर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गर्दी करू नका असे नानांनी आवाहन करुनही ते न जुमानता त्यांच्या चाहत्यांनी व विविध शाखातील सेवक वर्गाने सोशल डिस्टन्सिगचे भान जपत आपल्या लाडक्या पोशिंद्याचे अखेरचे दर्शन घेतले .
यावेळी तारकेश्वर गडाचे महंत शांतिब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री यांनी ‘ कै . योगेशच्या अकाली जाण्याने कलीयुगातील राम लक्ष्मणाची जोडी फुटली, मीही ज्या परिवाराचा घटक आहे तो श्री रेणूका माता परिवार आज पोरका झाला . ‘ अशा शब्दात श्रध्दांजली अर्पण करून भालेराव कुटुंबाचे सांत्वन केले .