पुणे पोलीस आयुक्तालयाच्या पाचही झोनची माहिती
– संजय कडू
पुणे – पुणे पोलीस आयुक्तालयाच्या 5 झोनच्या हद्दीमध्ये आतापर्यंत 2 हजार 821 करोनाचे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे झोन 1 मध्ये आढळले असून त्यांची संख्या 877 इतकी आहे. झोन-1 मधील पोलीस ठाण्यांतील पाच ते सहा पोलिसांना करोनाची लागण झाल्यावर तब्बल 150 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करावे लगले होते. तर येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भागामध्ये सर्वाधिक म्हणजे 421 करोनाचे रुग्ण सापडले आहेत.
पोलीस आयुक्तालयाच्या 5 झोनमध्ये 197 भाग करोना अतिसंवेदनशील म्हणून पुणे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहेत. या परिसरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
शहरातील पाच झोनपैकी झोन 1 मध्ये आतापर्यंत करोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहे. येथे 59 भाग अतिसंवेदनशील आहेत. शहरातील मध्यवर्ती भाग अशी ओळख असलेल्या खडक, फरासखाना, समर्थ, डेक्कन, विश्रामबागवाडा आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा भाग या झोनमध्ये येतो.
तर सर्वांत कमी करोनाचे रुग्ण हे झोन 3 मध्ये सापडले असून त्यांची संख्या 291 इतकी आहे. या झोनमध्ये अतिसंवेदनशील भागांचा समावेश आहे. पुणे पोलिसांनी झोननुसार करोनाच्या रुग्णांच्या माहितीची आकडेवारी तयार केली आहे. येरवडा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या भागात सर्वाधिक 421 रुग्ण सापडले आहेत.
त्यापाठोपाठ खडक पोलीस स्टेशनमध्ये 417, बंडगार्डन 389 इतके रुग्ण आढळले आहेत. तर अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत आतापर्यंत एकही करोनाग्रस्त रुग्ण सापडलेला. उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक तर कोरेगाव पार्क आणि डेक्कन पोलीस स्टेशनच्या परिसरात प्रत्येकी पाच करोनाचे रुग्ण आढळले आहेत. पोलिसांनी तयार केलेल्या या यादीमुळे शहरातील नेमके कुठल्या भागात करोनाचे किती रुग्ण आहेत, याची माहिती स्पष्ट होत आहे.