जयपूर – देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याचे प्रमुख अतिथी असलेले फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांचे आज जयपूरमध्ये आगमन झाले. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉ यांनी जयपूरमध्ये विराट रोड शो केला. जयपूरवासियांनी पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सच्या अध्यक्षांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
या रोड-शोनंतर पंतप्रधान मोदी आणँ मक्रॉ यांनी जयपूरमधील हवा महलला भेट दिली. हवा महल, “पॅलेस ऑफ ब्रीझ” म्हणूनही ओळखला जातो आणि 1799 मध्ये जयपूरच्या रॉयल सिटी पॅलेसचा विस्तार म्हणून बांधला गेला. रोड शो पूर्वी मॅक्रॉ यांनी जयपूरमधील जंतर मंतरलाही भेट दिली. तेथेच पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे स्वागत केले.
जंतरमंतरमध्ये महाराजा सवाई जय सिंह यांनी आकाशनिरीक्षण केंद्र उभारले आहे. त्याचीही दोन्ही नेत्यांनी पहाणी केली. ही इमारत युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीमध्ये २०१० साली सामील करण्यात आली. मॅक्रॉ यांनी जयपूरमधील अंबर किल्लाही बघितला आणि शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारीही होत्या.
जयपूरमधील प्रसिद्ध वास्तूकला अनुभवत असताना मॅक्रॉ यांना या ठिकाणांचा इतिहास देखील सांगितला गेला. संध्याकाळी रामबाग पॅलेस हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये अधिकृत चर्चा झाली. पंतप्रधान मोदींशी चर्चा झाल्यानंतर मॅक्रॉ आणि मोदी राजधानी दिल्लीकडे रवाना झाले. उद्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याला मॅक्रॉ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.