पुणे – उत्सवाच्या काळात ग्राहकांनी कर्जाचा वापर वाढवावा, यासाठी बॅंका या काळात काही कर्जावर सवलती देत आहेत. कर्जावरील प्रक्रिया शुल्क स्टेट बॅंकेने मर्यादित काळासाठी माफ केल्यानंतर आता ही सवलत बॅंक ऑफ इंडियाने जाहीर केली आहे.
बॅंक ऑफ इंडिया घरांसाठीच्या कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ करणार आहे. त्यामुळे 30 लाखांपर्यंतच्या घरासाठीचे कर्ज 8.35 टक्के व्याजदरावर उपलब्ध होईल. तर, त्यावरील घरासाठीचे कर्ज रेपो दराशी संलग्न दराने उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर बॅंकेने शैक्षणिक कर्जावरील व्याजदरावरही काही प्रमाणात सवलती दिल्या आहेत. बॅंक ऑफ इंडियाने छोट्या उद्योगासाठी वेल्कम ऑफर सुरू केलेली आहे. त्यानुसार तारण पाहून 50 लाख ते 5 कोटी पर्यंतच्या कर्जावरील व्याजदर अंशतः कमी केले जाणार आहेत. गेल्याच महिन्यात स्टेट बॅंकेने घर आणि वाहनासह इतर काही कर्जावरील प्रक्रिया शुल्क कमी केलेले आहे. त्यामुळे या काळात ग्राहकांची कर्जाची कर्जाचा वापर करण्याची इच्छा होईल असे या बॅंकांना वाटते. या काळात बऱ्याच कर्मचाऱ्यांना बोनस, वाढीव महागाई भत्ता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे कर्मचारी हात सैल करून खर्च करतील असे काही बॅंका अधिकाऱ्यांना वाटते.