दुखी होऊ नका, आपण चंद्रावर नक्कीच पोहोचणार; १० वर्षाच्या मुलाचे इस्रोला पत्र 

नवी दिल्ली – अवघ्या जगाचे लक्ष लागलेली भारताची महत्वाकांक्षी “चांद्रयान-2′ मोहीम चंद्राच्या 2.1 किलोमीटरवर जाऊन थांबली आहे. चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतराजवळ गेल्यावर विक्रम लॅंडरशी संपर्क तुटला आहे. विक्रम लॅंडरशी संपर्क तुटल्यानंतर इस्रोचे शास्त्रज्ञ निराश झाल्याने संपूर्ण भारत त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पुढे सरसावले. अशातच एका १० वर्षाच्या मुलाने इस्रोला पत्र लिहीत त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले आहे. हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

आन्जनेय कौल या १० वर्षाच्या मुलाने इस्रोला पत्र लिहले आहे. आन्जनेयची आई ज्योती कौल यांनी हे पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. आन्जनेयने ‘एका कृतज्ञ भारतीयांची भावना’ या शीर्षकाखाली पत्र लिहले आहे.

आन्जनेयने पत्रात म्हंटले कि, एवढया लवकर दुखी होऊ नका. आपण चंद्रावर नक्कीच पोहोचणार. आपला पुढचा प्रयत्न जूनमध्ये लॉन्च होणारा चांद्रयान-३ असेल. चांद्रयान -२चा ऑर्बिटर यशस्वीपणे काम करत आहे. तोच आपल्याला सांगेल कि पुढे काय करायचे आहे? तसेच शक्यता अशीही आहे की, विक्रम चंद्रावर लॅण्ड झाले असेल आणि प्रज्ञान रोव्हरही सुरक्षित असेल आणि ग्राफिकल बँड्सची तयारी करत असेल. असे असल्यास यश नक्कीच आपल्या हाती येईल. इस्रोचे शास्त्रज्ञ पुढील पिढीसाठी प्रेरणास्रोत आहेत. इस्रो तुम्ही आमचे गौरव आहात. तुम्हांला एका कृतज्ञ राष्ट्राकडून धन्यवाद.

दरम्यान, चांद्रयान २ मोहिमेतील लॅंडर विक्रमचा ठावठिकाणा समजला असून त्याच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के शिवन यांनी रविवारी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.