पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील उपलेखापाल सिद्धार्थ जगताप (वय 51) यांचे आज करोनामुळे निधन झाले. 11 जुलै रोजी त्यांचा करोना चाचणीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. वायसीएम रुग्णालयात आज पहाटे त्यांचे निधन झाले.
11 जुलै रोजी त्यांना करोनाची लागण झाल्याचे समजल्यावर त्यांना भोसरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर 14 जुलैला त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे त्यांचे निधन झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. सिद्धार्थ जगताप हे वायसीएम रुग्णालयात उपलेखापाल पदाची जबाबदारी सांभाळत होते.
आतापर्यंत करोनामुळे महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आठ दिवसांपूर्वी महापालिका शाळेतील कलाशिक्षक तुपे यांचे निधन झाले आहे.