यवत : गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक पेटला

खोपोडी हद्दीत घटना : जीवितहानी टळली

यवत :- शिरूर-सातारा राज्य मार्गावर गॅस  सिंलेडर वाहतूक करणाऱ्या ट्रकला (दि.22) रात्री एकच्या सुमारास आग लागली होती. घटनेत गॅस वाहतूक करणारा ट्रक जळून खाक झाला. मात्र, या घटनेत जीवितहानी टळली आहे. यावेळी आगीमुळे शिरूर- सातारा राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आग विझवल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरळीत झाली.

यवत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएनजी गॅस भरून हा ट्रक रांजणगाव येथून चौफुला बाजूकडे येत होता. खोपोडी हद्दीत आला असता ट्रकमधील केबिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यानंतर आग भडकून ट्रकने पेट घेतला.

ट्रकचालक श्रीराम सांगळे (वय 35, रा. पाटस, ता. दौंड जि. पुणे) हे ट्रकच्या बाहेर पडल्यामुळे ते बचावले. त्यानंतर पेटलेल्या ट्रकची आग विझवण्यासाठी दौंड नगरपरिषद तसेच कुरकुंभ एमआयडीसी, रांजणगाव एमआयडीसी असे तीन अग्नीशमन बंब पाचारण करण्यात आले होते. तीन बंबांनी लागलेली आग आटोक्‍यात आणण्यासाठी तीन तासांचा वेळ गेला. परंतु ट्रक पूर्णतः जळून खाक झाला. ट्रकमध्ये साठ सीएनजी गॅस भरलेल्या टाक्‍या होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.