देशात सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान ‘या’ राज्याला मिळाला

नवी दिल्ली  : देशात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण सापडत असताना एक चांगली बातमी समोर आली आहे. देशात करोनाविरुद्ध १०० टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण करणारे हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे. यासंदर्भात राज्याच्या एका अधिकृत प्रवक्त्याने हा दावा केला आहे.

राज्यात तब्बल ५३,८६,३९३ पात्र लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ऑगस्टच्या अखेरीस पात्र १०० टक्के लोकसंख्येला लसीचा पहिला डोस देणारं हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य ठरले होते, असेही त्यांनी सांगितले.

रविवारी बिलासपूर येथील ऑल-इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे करोना काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यावेळी लसीकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी ट्वीट करून जनतेचे अभिनंदन केले आहे. “आज आपल्या हिमाचलने आणखी एक इतिहास रचत देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. पात्र नागरिकांना कोविड लसीचा दुसरा डोस देऊन हिमाचलने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यातील सर्व जनतेचे हार्दिक अभिनंदन आणि आरोग्य विभाग/टीमचे आभार,” असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.