नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आपल्याच पक्षावर तिखट शब्दांत टीका केली आहे. तसेच, “नवा पक्ष स्थापन करण्याचा कोणताही विचार नाही, पण राजकारणात काय होईल, हे कुणीच सांगू शकत नाही”, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला आगामी काळात पक्षाच्याच ज्येष्ठ नेत्यांकडूनमोठी पावले उचलण्यात येणार का अशा चर्चांना उधाण आले आहे.
गुलाम नबी आझाद यांनी देखील कपिल सिब्बल यांच्या प्रमाणेच पक्षाला घरचा आहेर देण्याचा प्रयत्न केला आहे. जम्मू-काश्मीरमधील गुलाम नबी आझाद यांचे निष्ठावान असलेले काँग्रेसचे २० पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये नव्या पक्षाच्या स्थापनेची चर्चा जोरात सुरू झाली आहे.
दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी यावेळी बोलताना इंदिरा गांधी-राजीव गांधी आणि काँग्रेसचं आत्ताचं नेतृत्व यांच्यात तुलना केली आहे. “नेतृत्वाला कुणीही आव्हान देत नाहीये. इंदिरा गांधी आणि राजीव गांधींनी मला काही चुकीचं घडल्यास त्यावर प्रश्न विचारण्याची मोकळीक दिली होती. त्यांचा टीकेबाबत आक्षेप नसायचा. त्यांना यात अपमान नव्हता वाटत. आज काँग्रेसमध्ये नेतृत्वाला यात अपमान वाटतो”, असं गुलाम नबी आझाद पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
“राजकारणात पुढे काय घडेल, हे कुणीही सांगू शकत नाही, जसं कुणीही हे सांगू शकत नाही की त्याचा मृत्यू कधी होणार आहे. राजकारणात कधीही काहीही घडू शकतं, पण नवा पक्ष स्थापन करण्याचा कोणताही विचार नाही. माझी स्वत:ची राजकारण सोडण्याची इच्छा होती. पण लाखो समर्थकांसाठी मी काम करत राहिलो”, असं आझाद म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये एका सभेमध्ये ते बोलत होते.