दिल्ली वार्ता: जवळीक वाढविण्याचा प्रयत्न

वंदना बर्वे

अमेरिकासारख्या देशालाही चीनने नमतं घ्यायला लावलं आहे. ही बाब अनेकांनी बघितली आहे. तोच देश आता सीमेचा वाद चर्चेतून सोडविला गेला तर उत्तम होईल असं म्हणू लागला आहे. हा वाद खरंच सलोख्याने संपुष्टात आला तर जगासाठी हा नवीन संदेश असेल.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपींग यांच्या भारत दौऱ्यामुळे भारताचा प्रभाव विश्‍व पटलावर वाढतो आहे, असे वाटू लागले आहे. जगातील कोणत्याही देशासमोर चीनने कधीही नमतं घेतलेलं नाही. मात्र, भारताशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न चीनकडून सारखा होत आहे. भारताशिवाय एकविसाव्या शतकातील आशिया खंडाची कल्पना केली जाऊ शकत नाही, असं चीनचं म्हणणं आहे. अर्थातच, चीनच्या व्यवहारात जो सौम्यपणा आला आहे तो एक दिवसात आलेला नाही. यामागे वर्षानुवर्षांची मेहनत आणि योजना आहे. एकेकाळी भारतावर आक्रमण करणारा चीन आता दोन्ही देशातील संबंध सलोख्याचे राहावे यासाठी प्रयत्न करीत आहे. भारत आणि चीनचे संबंध चांगले राहिले नाही तर आशियाचा उदय शक्‍य नाही, असं चीनला वाटू लागलं आहे.

भारताशी जुळवून घेण्यास चीन किती उत्सुक आहे याची जाणीव यावरून करता येईल की चीनने काश्‍मीर मुद्द्यावरून यू-टर्न घेतला आहे. भारत-पाकिस्तानने हा मुद्दा यूएनच्या माध्यमातून सोडविण्याचा सल्ला चीनने आधी दिला होता. मात्र, भारताची मुत्सद्येगिरीपुढे नमतं घेत चीनने आता आपली भूमिका बदलली आहे. भारताचे चीनच्या विधानावर आक्षेप घेताच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने काश्‍मीरला भारत-पाकिस्तान दरम्यानचा मुद्दा असल्याचे स्पष्ट केले.

महत्त्वाचा मुद्दा हा नाही की, काश्‍मीर मुद्द्यावर चीनचं काय म्हणणं आहे? मुद्दा हा आहे की, काश्‍मीरचा वाद जागतिक पातळीवर उचलला जात असतानाही चीनला भारताशी जवळीक साधायची आहे. एवढेच नव्हे तर, अमरिकासुद्धा भारत नाराज होणार नाही याची काळजी घेऊ लागला आहे. भारताने आक्षेप नोंदविल्यानंतर अमेरिकेलाही आपले विधान मागे घ्यावे लागले आहे. भारताने कोणत्याही देशाला नाराज न करता जागतिक पातळीवर स्वतःची धाक निर्माण करण्यात यश मिळविलं आहे. सध्या चीन आणि अमेरिका दोन धृव आहेत. भारत यात तिसरा धृव होण्याच्या मार्गावर आहे. बिम्सटेकचे सदस्य शेजारी देश असोत वा यूएई किंवा बहरीनसारखे मुस्लीम राष्ट्र, वा चीन-अमेरिका नरेंद्र मोदी यांनी सर्वांना साधन्यात यश मिळविलं आहे.

खरं म्हणजे, शी जिनपींग यांच्या भारत दौऱ्याची तयारी गेल्या चार-पाच महिन्यांपासून सुरू होती. फक्‍त भेटीचं ठिकाण ठरत नव्हतं. या भेटीसाठी ज्या तीन शहरांची नावे चर्चेत होती त्यातील एक म्हणजे वाराणसी. मात्र, उभय नेत्यांच्या भेटीसाठी तामिळनाडूच्या मामल्लपुरमची निवड झाली. मुळात, भारत सरकारकडून तीन-चार शहरांचा पर्याय सुचविला जातो आणि आमंत्रित देशाकडून त्यातील एका शहराची निवड केली जाते. शेवटी चीनने तामिळनाडूमधील मामल्लपुरमची निवड केली. आणि या शहरात दोन्ही नेत्यांची भेट झाली. सध्या ही भेट खूप चर्चेत आहे. नरेंद्र मोदी पारंपरिक दक्षिण भारतीय पेहरावात दिसून येत आहेत. ते मामल्लपूरम्‌ (महाबलीपूरम) मधल्या ऐतिहासिक वास्तूंची माहिती शी जिनपिंग यांना देताना आपण सर्वांनी बघितलं.

देशाची राजधानी दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबई आणि धर्मनगरी वाराणसी जो नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघसुद्धा आहे; तेथे ही बैठक न घेता मामल्लपूरम येथे घेण्यात आली. त्यामागे बरीच कारणे आहेत. भेटीचं स्थळ निवडताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. मात्र, शहराची निवड आमंत्रित देशाकडून केली जाते. मामल्लपूरम चेन्नईपासून 62 किमी अंतरावर ईस्ट कोस्ट रोडवर स्थित आहे. मामल्लपुरम हे पल्लव काळापासून असलेलं एका दगडात कोरलेले रथ, गुहांमधल्या मंदिरांचं बनलेलं आहे. अर्जुनानं येथे तपस्या केली होती, अशी दंतकथा आहे. युनेस्कोच्या ऐतिहासिक ठिकाणाचा दर्जा मामल्लपुरमला प्राप्त झाला आहे. मामल्लपूरम हे तमिळनाडूमधलं पर्यटकांसाठीचं महत्त्वाचं ठिकाण आहे. समुद्रकिनाऱ्यावरचं मंदिर, इथलं कृष्णाचा वान इरई काल (इंग्रजी नाव- कृष्णाज्‌ बटर बॉल) आदी काही ठिकाणांचा कार्यक्रम पत्रिकेत समावेश आहे. या भेटीमुळे इथलं दुरुस्तीचं काम थांबवण्यात आलं.

नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग भेटीसाठी परिसरात अभेद्य सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. 500 पेक्षा जास्त पोलीस सुरक्षेच्या कारणास्तव तैनात करण्यात आले आहेत. चीनच्या दूतावासाकडून 20 अधिकाऱ्यांनी 20 सप्टेंबरच्या आसपास मामल्लपूरम पाहणीसाठी भेट दिली होती. शिवाय तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पन्नेरसेल्वम्‌ यांनी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली होती. मामल्लपूरममध्ये पर्यटकांना पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. येथील वराह गुहा मंदिर प्रसिद्ध आहे.

गुहेतील वराहाच्या शिल्पावरूनच वराह गुहा मंदिर हे नाव पडलेलं आहे. नृसिंहासाठी हे मंदिर बांधलेलं आहे, अशीही दंतकथा आहे. इथे दोन स्तंभ असून ते भिंतीशी जोडलेले आहेत. मंदिराचं गर्भगृह आतल्या बाजूचं बंदिस्त स्वरूपातील नाही, तर ते बाहेरील बाजूस उघडणारं आहे. भिंतीतही वराह शिल्प कोरलेलं आहे. मंदिर एका भल्यामोठ्या दगडात कोरलेलं आहे. 30 मीटर उंच आणि 60 मीटर रुंद असा या दगडातील मंदिराचा विस्तार आहे, अर्जुनाचे तपस्यास्थळ किंवा भागीरथाचे तपस्यास्थळ म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. ही जागा खासकरून पांडव गुहा म्हणून प्रसिद्ध आहेत. जमिनीला जोडल्या गेलेल्या दगडात ही मंदिरं कोरलेली आहेत. ही मंदिरं पांडवांसाठी बांधली असल्याची दंतकथा आहे, परंतु इथे शिल्प सापडलेली नाहीत. ही मंदिरं शिव, विष्णू आणि कोत्रावाई आदी देवांसाठी बांधलेली होती, असे सांगितले जाते. प्रत्येक मंदिर वेगवेगळ्या आणि अनोख्या पद्धतीनं बांधण्यात आलं आहे.

मामल्लपूरम नाव किनाऱ्यावरील दोन्ही मंदिरांची प्रतिमा उभी करते. तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर 2004 साली त्सुनामी आली त्यावेळी मंदिरांमध्ये पाणी शिरलं होतं, परंतु मंदिरांचं फारसं नुकसान झालेलं नाही. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग स्थापन केलेले आहे. तमिळनाडूतील युनेस्कोचा दर्जा लाभलेल्या तीन ठिकाणांमधील मामल्लपूरम हे एक ठिकाण आहे.
शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या या भेटीपूर्वी उभय नेत्यांची एक भेट गेल्या वर्षी एप्रिलमध्ये चीनच्या वुहान येथे झाली होती. 2017 मध्ये निर्माण झालेल्या डोकलाम वादामुळे दोन्ही देशांतील संबंधात तणाव निर्माण झाला असताना ही भेट झाली होती.

मामल्लपूरमची भेट ही त्यानंतरची पहिलीच. खरं म्हणजे, दुसऱ्या देशाच्या राष्ट्र प्रमुखाची बैठक कुठे आयोजित करायची याचा निर्णय त्या देशाकडून घेतला जातो. मात्र, भेटीचे स्थळ सुचविताना ज्या शहरांचा पर्याय दिला जातो तेव्हा भारताकडून खास खबरदारी घेतली जाते. देशाची राजधानी किंवा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शहरांचीच निवड अशाप्रकारच्या बैठकीसाठी केली जाते. अशाप्रकारची खबरदारी नाही घेतली गेली तर दोन्ही देशांतील संबंधात बिघाड येण्याची शक्‍यता असते.

Leave A Reply

Your email address will not be published.