व्यवहार्य “राज’ कारण (अग्रलेख)

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली असताना सर्वच पक्षांचे नेते जाहीर सभा आणि इतर विविध माध्यमातून सत्तेसाठी मतांचा जोगवा मागत आहेत. आम्हाला पुन्हा सत्ता द्या, आम्ही अधिक प्रगती करून दाखवू असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात असताना विरोधी पक्ष आम्हाला सत्ता द्या, आम्ही विकास करू असे आश्‍वासन देत आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात आपल्याला विरोधी पक्षात बसवण्याची केलेली मागणी वेगळी असली तरी सद्यस्थितीत व्यवहार्य आणि उपयुक्‍त आहे.

सगळे पक्ष सत्तेसाठी मते मागत असताना राज ठाकरे यांनी विरोधी बाकांवर बसण्यासाठी मागितलेली मते काही जणांसाठी चेष्टेचा विषय असला तरी राजकारणात अशी व्यवहार्य भूमिका घेण्यासाठी धैर्य लागते हे मान्य करावे लागेल. एकतर राज यांना आपल्या पक्षाचा आवाका माहीत आहे. आता आपण सत्तेवर येऊ शकत नाही याची जाणीव त्यांना आहे. दुसरीकडे राज्यात विरोधी पक्ष प्रभावीपणे काम करीत नाहीत हे वास्तव आहे. अशा वेळी ही पोकळी भरून काढण्यासाठी राज यांनी विरोधी बाकांवर बसण्याची इच्छा व्यक्‍त करून तशी रणनीती आखली असेल तर त्यात चुकीचे काहीच नाही. वेळ आल्यावर मी सत्तेसाठी मते मागीन, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज यांच्या या भूमिकेवर टीका करण्यापेक्षा राज यांना अशी भूमिका का घ्यावी लागली याचा विचार सर्वच पक्षांनी विशेषतः इतर विरोधी पक्षांनी करायला हवा. खरे तर शिवसेनेतून बाहेर पडून राज यांनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला तेव्हा मतदारांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पक्ष स्थापनेनंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेला 13 जागा मिळाल्या होत्या. त्याशिवाय राज्यात नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबई या शहरात महापालिका निवडणुकीतही चांगले यश मिळाले होते; पण यशाचा हा टेम्पो राज यांना कायम राखता आला नाही.

2014 ची लोकसभा निवडणूक आणि नंतर झालेली विधानसभा निवडणूकही त्यांनी लढवली नाही. तेव्हा त्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता; पण पाच वर्षांत त्यांची भूमिका बदलली आणि ते मोदी यांचे कट्टर विरोधक बनले. 2019 ची लोकसभा निवडणूकही त्यांनी लढली नाही; पण इतर विरोधी पक्षांसाठी ते स्टार प्रचारक बनले. लोकसभेची एकही जागा न लढवता त्यांनी राज्यात सभा घेतल्या. मोदी विरोधात चांगली वातावरण निर्मिती होऊनही मतदारांनी मोदी यांनाच पुन्हा सत्ता दिल्याने राज ठाकरे पुन्हा बॅकफूटवर गेले. त्यांचा पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार की नाही याचाही काही काळ संभ्रम होता; पण थोड्या जागा लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या थोड्या जागांच्या बळावर आपण सत्तेत येऊ शकत नाही याची पूर्ण कल्पना असल्यानेच त्यांनी विरोधी बाकांवर बसण्याची व्यवहार्य भूमिका घेतली.

राज्यातील प्रमुख विरोधी आघाडी असलेल्या कॉंग्रेस आघाडीने राज यांना आपल्या आघाडीत घेण्यासाठी फारशी उत्सुकता न दाखवल्याने राज यांनी ही वेगळी भूमिका घेतली आहे हे उघड आहे. लोकसभा निवडणुकीत राज यांच्या करिष्म्याचा वापर करून घेणारे पक्ष आता पुन्हा त्यांच्याशी मैत्री करण्यात उत्सुक नाहीत हे राज ठाकरे यांच्या लक्षात आले. त्यामुळे आता विरोधात असलेली आघाडी निवडणुकीनंतर सत्तेवर आली तरी मला मात्र विरोधी बाकांवर बसायला आवडेल अशी भूमिका घेऊन राज यांनी एक वेगळा पर्याय समोर मांडला. सध्याचे विरोधी पक्ष सक्षमपणे काम करीत नसल्याचा संदेशही त्यातून गेला आहे. महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करणारे कॉंग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील स्वतः भाजपमध्ये जातात तेव्हा ही बाब जास्तच अधोरेखित होते.

विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे अनेक नेते सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जाऊन बसल्याने विरोधी बाकांवर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विधानसभेतच नव्हे तर रस्त्यावरील आंदोलन करतानाही विरोधी पक्षांची दमछाक होताना दिसत आहे. रस्त्यावरील खळ खट्याक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या राज ठाकरे यांनी म्हणूनच आता सभागृहातही सक्षम विरोधी पक्ष कसा असतो हे दाखवून देण्यासाठीच सत्तेसाठी नाही तर विरोधी बाकांवर बसण्यासाठी मते मागितली आहेत. मोदी लाटेचा तडाखा बसलेले विरोधी पक्ष अद्याप सावरले नाहीत.

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास शरद पवार यांच्यामुळे काही प्रमाणात आव्हान कायम आहे. कॉंग्रेसने शस्त्रे टाकून दिल्यासारखे दिसते. मधल्या काळात शिवसेनेने सत्तेत असूनही विरोधी पक्षाची भूमिका घेतली होती. जी कामे किंवा आंदोलने विरोधी पक्षाने करायला हवीत ती कामे शिवसेनेने केली. शेतकऱ्यांच्या विम्यासाठी मोर्चा काढला. सरकारवर सतत जहरी टीका केली. या काळात बाकीचे विरोधी पक्ष गप्पच होते. दिल्लीत असो किंवा राज्यात असो विरोधी पक्षांना कमकुवत करण्याचे काम सत्ताधारी भाजपने चोखपणे पार पाडले होते.

साहजिकच विरोधी गटात एक पोकळी निर्माण झाली होती ही पोकळी आणखी काही काळ राहण्याची शक्‍यता लक्षात घेऊनच राज ठाकरे यांनी ती पोकळी भरून काढण्यासाठी विरोधात बसण्यासाठी मते मागितली आहेत. राज्याला सध्या मजबूत आणि सक्षम विरोधी पक्ष आणावा याची गरज आहे. सरकारला जाब विचारणारा विरोधी पक्ष हवा आहे ही त्यामागील राज यांची भूमिका आहे. इतके दिवस “महाराष्ट्राची सत्ता एकदा हाती द्या, मी तुम्हाला हा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून दाखवेन’, अशी मागणी जाहीर सभेत कायम करणारे राज ठाकरे यांची ही भूमिका बॅकफूटवर जाणारी असली तरी व्यवहार्य आहे.

भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशात सक्षम आणि तुल्यबळ विरोधी पक्ष अत्यंत आवश्‍यक आहे. आतापर्यंतचे प्रस्थापित विरोधी पक्ष जर ही जबाबदारी पार पाडत नसतील तर ही जबाबदारी अन्य कोणी घेण्याचीही गरज आहे. राज ठाकरे यांनी ती तयारी दाखवून आपल्या राजकारणाचे वेगळेपण स्पष्ट केले आहे. विधानसभेत सक्षमपणे सरकारला जाब विचारण्यासाठी मतदार मनसेच्या किती नेत्यांना आमदार म्हणून पाठवणार एवढाच प्रश्‍न आता बाकी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.