अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी आता क्षेपणास्त्रसज्ज विमाने

एअर इंडियाकडून हवाई दलाच्या वैमानिकांना प्रशिक्षण

नवी दिल्ली- भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी असलेल्या विमानांमध्ये आता अत्याधुनिक मिसाइल डिफेन्स सिस्टिम असणार आहे. या विमानांचे उड्डाण एअर इंडियाचे वैमानिक नव्हे तर हवाई दलाचे वैमानिक करतील. एअर इंडियाकडून हवाई दलाच्या वैमानिकांना बोईंग 777 विमानांच्या उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील सर्वोच्च स्थानावर विराजमान असलेले दिग्गज नेते जुलै 2020 पासून बोईंग 777 या विमानातून प्रवास करतील.

देशाच्या पंतप्रधानांसाठी पहिल्यांदाच अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज विमाने असतील. वैमानिक बदलणार असले तरी या विमानांची देखभाल करणारे पथक एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडचे (एआयईएसएल) असणार आहे. या विमानांमध्ये एअर इंडियाचे क्रू मेंबरच सेवा देतील. अमेरिकी प्लांटमध्ये या विमानांची निर्मिती होत आहे. अमेरिकी बी 777 विमानात लार्ज एअरक्राफ्ट इन्फ्रारेड काऊंटर मेजर्स (एलएआयआरसीएम) आणि सेल्फ प्रोटेक्‍शन सुट्‌स (एसपीएस) असणार आहेत. ही विमाने जुलै 2020 मध्ये भारतात आणली जातील. पहिल्यांदाच या नेत्यांना घेऊन उड्डाण भरणाऱ्या विमानांचे सारथ्य एअर इंडियाचे वैमानिक करू शकणार नाहीत.

भारतीय हवाई दलाचे वैमानिक नवीन विमान उड्डाण करतील आणि त्यांच्यासाठी “एअर इंडिया वन’ असे संबोधन असेल. बोईंग 747 हे विमान एअर इंडियाच्या वैमानिकांनी चालवले आहे. एअर इंडियाची सहाय्यक कंपनी एअर इंडिया अभियांत्रिकी सेवा लिमिटेड (एआयईएसएल) या नव्या विमानांची देखभाल करेल.

बोईंग 777 हे विमान एसपीएस सज्ज असलेले पहिले भारतीय विमान असेल जे अमेरिकेने फेब्रुवारी 2019 मध्ये दोन्ही बाजूंच्या दरम्यान झालेल्या कराराच्या भाग म्हणून भारताला देण्याचे मान्य केले होते. कराराचा एक भाग म्हणून अमेरिकेने एसपीएस विक्रीस सहमती दर्शविली आहे. हा व्यवहार 190 दशलक्ष डॉलर्सचा आहे. विमानात असलेले एसपीएस शत्रूच्या रडार फ्रिक्वेन्सीला अडथळा आणण्यास, उष्मा शोधणाऱ्या क्षेपणास्त्रे वळविण्यास आणि प्रगत इंटरमिजिएट-रेंज क्षेपणास्त्र यंत्रणेला अडवण्यास सक्षम आहे. सध्या पंतप्रधानांसह सर्व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी बोईंग 747 हे विमान वापरले जाते. त्याऐवजी आता बोईंग 777 वापरले जाईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)