#WIPL : सुपरनोव्हाजने पटकावले टी-20 चॅलेंज स्पर्धेचे सलग दुसरे विजेतेपद

रोमहर्षक अंतिम सामन्यात व्हेलॉसिटीवर चार गडी राखून मात

जयपूर – अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या महिलांच्या टी-20 चॅलेंज स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुपरनोव्हाजने व्हेलॉसिटीवर 4 विकेट्‌सने मात करत विजेतेपदावर नाव कोरले. विजयासाठी 122 धावांचे आव्हान सुपरनोव्हाजने 20 षटकांत 6 बाद 125 धावा करत पूर्ण केले. कर्णधारहरमनप्रित कौरने केलेले अर्धशतक निर्णायक ठरले. व्हेलॉसिटीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 121 धावा केल्या.

122 धावांचा पाठलाग करताना प्रिया पुनिया (29) आणि जेमिम्हा रॉड्रगिज (22) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी करत आक्रमक सुरुवात करून दिली. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या कर्णधार हरमनप्रित कौरने सर्व सूत्रे आपल्या हाती घेतले. हरमनप्रितने 37 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार खेचत 51 धावांची खेळी करत संघाला विजयासमीप नेले. त्यानंतर राधाने सामन्यातील अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकत विजयावर शिक्‍कामोर्तब केला.

तत्पूर्वी, व्हेलॉसिटीची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर हायले मॅथ्युज (0) आणि शेफाली वर्मा (11) यांना ली ताहूहू हिने बाद करत व्हेलॉसिटीला दोन धक्‍के दिले. त्यानंतर डॅनिएली वॅट (0), व्ही. कृष्णमूर्ती (8) आणि कर्णधार मिताली राजही झटपट बाद झाल्या.

व्हेलॉसिटीची 5 बाद 37 अशी दयनीय अवस्था असताना सुषमा वर्मा आणि अमेलिया केर यांनी सहाव्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी करत डाव सावरला. अमेलिया केर हिला पूनम यादवने हरमनप्रित कौरकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. सुषमा वर्माने 32 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार खेचत नाबाद 40 धावांची खेळी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.