#IPL2021 | साहा – मिश्रा करोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली – देशात करोना महामारीने हाहाकार उडवला आहे. या करोनाचा यंदाच्या आयपीएल हंगामालाही जोरदार फटका बसला आहे. अनेक खेळाडू आणि संघाशी निगडित अन्य सदस्य करोनाच्या विळख्यात अडकत आहेत. यात आता हैदराबादचा वृद्धिमान साहा, दिल्लीचा अमित मिश्रा ही करोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याला ताप आला होता. यानंतर त्याची चाचणी केली असता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो पाच दिवसांपासून एका खोलीत एकांतात होता.

दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचे संदीप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती, चेन्नई सुपर किंग्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस साफ करणारा कर्मचारी हे लोक करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे करोनाने संघांच्या बायोबबलमध्येही प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसेच मागील 2 दिवसांत करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूंमध्ये दिल्लीचा दिग्गज गोलंदाज अमित मिश्राचाही समावेश झाला आहे. दिल्लीचा संघ गेल्या काही दिवसांपासून अहमदाबादमध्ये असून, तिथे केलेल्या करोना चाचणीदरम्यान मिश्राचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत अमित मिश्राची कामगिरी शानदार राहिली आहे. त्याने 154 सामन्यात 23.97 च्या सरासरीने 166 विकेट्‌स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये लसिथ मलिंगानंतर सर्वाधिक विकेट्‌स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. तसेच आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा हॅट्ट्रिक घेण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. त्याने 3 वेळा आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेतली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.