नवी दिल्ली – ऑलिम्पीक पदक विजेती पैलवान साक्षी मलिकने माघार घेतली असल्याचे तसेच ती विनेश फोगट आणि बजरंग पुनीया या खेळाडूंसोबत आता आंदोलनात असणार नाही असे वृत्त आज प्रसारित झाले होते. साक्षीही सुरूवातीपासून आंदोलनात सहभागी होती. तथापि, आता तिने आपले नाव मागे घेतले असल्याचे संबंधित वृत्तात म्हटले होते. मात्र साक्षीने ते फेटाळले आहे.
न्यायासाठी सुरू असलेल्या या लढ्यात ना कोणी माघार घेतली आहे ना कोणी घेणार आहे असे तिने स्पष्ट केले आहे. आंदोलनाबरोबर मी रेल्वेतील जबाबदारी पार पाडत आहे. तिकडेही मी लक्ष देते आहे. न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. कृपया चुकीच्या बातम्या पसरवू नयेत असे तिने म्हटले आहे. पदक विजेते साक्षी मलिक आणि बजरंग पुनीया या दोघांना रेल्वेत नोकरी देण्यात आली आहे.
ये खबर बिलकुल ग़लत है। इंसाफ़ की लड़ाई में ना हम में से कोई पीछे हटा है, ना हटेगा। सत्याग्रह के साथ साथ रेलवे में अपनी ज़िम्मेदारी को साथ निभा रही हूँ। इंसाफ़ मिलने तक हमारी लड़ाई जारी है। कृपया कोई ग़लत खबर ना चलाई जाए। pic.twitter.com/FWYhnqlinC
— Sakshee Malikkh (@SakshiMalik) June 5, 2023
“आम्ही गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली. तेव्हा ब्रिजभूषण सिंग यांना अटक करण्याची मागणी केली आहे. आम्ही आंदोलनातून माघार घेतली नाही. मी रेल्वेच्या कामावर रुजू होणार आहे. न्याय मिळेपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे. मुलीने एफआयआर मागे घेतल्याचं वृत्त चुकीचं आहे,” असं साक्षी मलिकने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
“आंदोलन मागे घेतल्याची बातमी अफवा आहे. आमचे नुकसान करण्यासाठी या बातम्या पसरवल्या जात आहेत. आम्ही मागे सरकलेलो नाही आणि आंदोलनही मागे घेतलेले नाही. महिला पैलवानांची एफआयआर परत घेतल्याच्या बातम्याही खोट्या आहेत. न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील.”
-बजरंग पुनीया
शहांच्या भेटीत काय झाले?
राजधानीतील एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार ब्रिजभूषण यांच्या अटकेच्या मागणीसाठी मैदानात उतरलेल्या या तीन खेळाडूंनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. दोन तास झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली असे नंतर पुनीयाला विचारण्यात आले होते. मात्र आमची चर्चा झाली एवढेच त्याने सांगितले व तपशील देण्यास नकार दिला. तर काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल, तपासासाठी वेळ दिला पाहिजे असे शहा यांनी पैलवानांना सांगितले होते.
अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी सांगितले सत्य….
कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी एका अल्पवयीन महिला पैलवानाचा विनयभंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्या मुलीच्या कुटुंबीयांनी ब्रिजभूषण यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतरच त्यांच्या विरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी अन्य पैलवान आंदोलन करत आहेत.
दरम्यान, संबंधित अल्पवयीन मुलीने पलटी मारली असून तिच्या कुटुंबीयांनी तक्रार मागे घेतली असल्याची बातमी रविवारी पसरल्यावर चांगलीच खळबळ उडाली होती. तथापि, तिच्या पित्याने आणि आजोबाने याचे खंडन केले आहे. त्यानंतर साक्षी मलिकनेही विनेश फोगट आणि बजरंग पुनीया यांची साथ सोडल्याची बातमी प्रसारित झाली. ज्याचा तिनेही इन्कार केला आहे. गेल्या काही तासांतील या दोन बातम्या पाहता पैलवानांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे का अशी शंका निर्माण झाली आहे.
एका माध्यमाशी बोलताना तिच्या पित्याने सांगितले की आम्ही अजूनही आमच्या आरोपांवर ठाम आहोत. आम्ही आता हरियाणात नाही आणि दिल्लीतही नाही. 16 व्या वर्षी माझ्या मुलीने झारखंडच्या रांची येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ज्यूनिअर गटात सुवर्णपदक पटकावले होते. येथेच फोटो काढण्याचा बहाणा करत ब्रिजभूषणने दिला आपल्याजवळ ओढून घट्ट पकडले होते. अगोदर तिच्या खांद्यावर हात ठेवत नंतर त्यांनी असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला. तू मला सपोर्ट कर मी तुला सपोर्ट करतो असेही त्यांनी तिला धमकावले होते. आम्ही एफआयआरमध्ये हेच सगळे म्हटले असून त्यावर आम्ही ठाम आहोत.