पुणे : भाजप पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पं. दीनदयाळ उपाध्याय भव्य नोकरी महोत्सव व छत्रपती शाहू महाराज करिअर मार्गदर्शन शिबिरात तब्बल 1 हजार 61 युवक युवतींना रोजगाराची संधी मिळाली आहे.
त्यात, 361 जणांना या मेळाव्यात सहभागी कंपन्यांनी थेट नियुक्तीपत्र दिले आहे तर तब्बल 700 जणांना पुढील आठवड्याभरात मुलाखतींसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. आमदार सुनील कांबळे यांच्या पुढाकाराने हा नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक,भाजपचे प्रदेश पदाधिकारी राजेश पांडे, कौशल्य विकास विभाग जिल्हा परिषद विकास रोजगार मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.
दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. या मेळाव्यात सुमारे 4 हजार 661 युवक युवतींनी नोंदणी केली होती. तर अनेकांना अवघ्या एका तासाच्या आत पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.