नवी दिल्ली – आंदोलनकर्ते कुस्तीपटू आता न्यायालयात लढा देणार, असे ऐकल्यावर माध्यमांशी बोलताना भारतीय कुस्तीगीर महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना हसू आले. त्यांच्या या हसण्यावर आता आंदोलमकर्त्या कुस्तीपटूंनी संताप व्यक्त केला आहे. ब्रिजभूषण आज हसत आहेत, पण उद्या रडताना दिसतील, अशी खोचक प्रतिक्रिया बजरंग पुनियासह अन्य कुस्तीपटूंनी दिली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून देशातील कुस्तीपटू ब्रिजभूषण यांच्या विरुद्ध आंदोलन करत आहेत.
ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी जंतरमंतरवर महिनाभराहून अधिक काळ आंदोलन केले. आतापर्यंत हा लढा रस्त्यावर लढला जात होता, पण आता ही लढत न्यायालयात सुरू राहील, असे मत या कुस्तीपटूंनी व्यक्त केले होते. हे मत ऐकल्यावर ब्रिजभूषण माध्यमांसमोर हसले.
त्यावरून आता कुस्तीपटू पुन्हा संतप्त झाले असून ब्रिजभूषणसारख्या व्यक्तींवर कोणाचेच नियंत्रण नाही का, असा सवालही त्यांनी केला आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे. मला त्यावर काहीही बोलायचे नाही मात्र आता सर्व काही ठीक होईल. न्यायालय आपले काम करेल, असे मत ब्रिजभूषण यांनी व्यक्त केले आहे.
सरकार व न्यायव्यवस्थेवर विश्वास
आमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, ब्रिजभूषण जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल, असे आश्वासन सरकारने दिले असल्याने आता हा लढा न्यायालयातच लढला जाईल, असे मत साक्षी मलिकने व्यक्त केले आहे. ब्रिजभूषण यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्याने अर्धी लढाई आम्ही जिंकली आहे. आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, असेही ती म्हणाली.
घर का भेदी
या आंदोलनावर सतत टीका करत असलेल्या भारताच्या योगेश्वर दत्त या कुस्तीपटूला बजरंग व साक्षीने घर का भेदी असे म्हटले आहे. जो व्यक्ती स्वतः खेळाडू आहे, त्याला जर हा अन्याय दिसत नसेल तर त्याने त्याच्या स्वार्थासाठी अन्य कोणाशी तरी गाठ बांधली असावी, अशा शब्दात साक्षीने योगेश्वरवर पलटवार केला आहे.