मुंबई – सध्या जगात “आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा वापर केवळ अमेरिका आणि पाश्चात्य देशांमध्येच नव्हे, तर आपल्याही देशात आता वाढत आहे. हा आजच्या या डिजिटल युगातला सर्वात मोठा बदल आहे. सध्या सोशल मीडियावर एआयने बनवलेले अनेक फोटोज व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये राजकारणी मंडळींपासून ते सिने स्टार्सच्या फोटोजचा समावेश असतो. मात्र सध्या एका मुलीला कोयता हल्लयातून वाचवणाऱ्या तरुणांचा एआय अवतार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
सदाशिव पेठेत मंगळवारी २७ जून रोजी एका विद्यार्थिनीवर तरुणाने कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला.मात्र वेळीच तेथील तरुणांनी प्रसंगवधान दाखवत त्या मुलीचे प्राण वाचवले. लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील असे या दोन तरुणांचे नाव आहे. सध्या राज्यभरातून या दोघांचे कौतुक केले जात आहे.या तरुणांनी केलेल्या धाडसी कामगिरीचा गौरव करत त्यांचे काही एआय अवतारातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताहेत.
अमित वानखेडे यांनी या तरुणांचे एआय अवतारातील फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. “काल पुणे येथील घटनेत ताईचा जिव वाचविणारे सुपरहिरो..लेशपाल व हर्षद तुमच्या हिमतीला सलाम” अशा कॅप्शनखाली हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. फोटोंमध्ये लेशपाल आणि हर्षद यांचा आयर्नमॅन व सुपरमॅनच्या अवतारातील लूक पाहायला मिळतोय. अमित वानखेडे यांनी शेअर केलेले हे फोटो रिट्विट करत अनेकांनी या खऱ्या हिरोजचे कौतुक केले आहेत.
काल पुणे येथील घटनेत ताईचा जिव वाचविणारे सुपरहिरो..
लेशपाल व हर्षद तुमच्या हिमतीला सलाम 🙏
Concept Art By Me#ai pic.twitter.com/6xTUxjCGdW— Amit Wankhade (@Amit_I_Patil) June 28, 2023
काय घडलं नेमकं त्यावेळी
आरोपी शंतनु जाधव तरुणीवर कोयत्याने वार करत असतानाच लेशपालने त्याला धक्का देऊन खाली पाडले. यानंतर मागून आलेल्या हर्षद पाटील याने आरोपीच्या हातातील कोयता खेचून घेतला. त्यांच्या मदतीला सतीश नेहूल आणि इतर विद्यार्थी धावले. काही नागरिक आणि तरुणांनीही धाव घेत शंतनूला मिळेल त्या वस्तूने मारण्यास सुरुवात केली. नागरिकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी शंतनूला घेराव घालून वाचवले. त्याला पकडून शेजारील पेरुगेट पोलीस चौकीत नेले.