नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाने कुस्तीपटू दीपक पुनियाचे परदेशी प्रशिक्षक मुराद गैदरोव यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. कांस्य पदकासाठी झालेल्या प्ले ऑफ सामन्यातील पंचाला मारहाण केल्याच्या आरोपाखाली त्यांचावर कारवाई करण्यात आली आहे.
या सामन्यात दीपक पुनियाला सैन मारिनोच्या माइल्स नजीम अमीनकडून पराभव स्वीकारावा लागला होता. हा सामना संपल्यानंतर गैदरोव पंचांच्या खोलीत गेले आणि पंचांसोबत मारहाण केली.
कुस्तीतील सर्वोच्च संस्था युनाइटेड विश्व कुस्तीने भारतीय कुस्ती महासंघाला या घटनेच्या सुनावणीसाठी बोलावले होते. यामध्ये भारतीय कुस्ती महासंघासाठी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण या सुनावणीत गैदरोव यांच्यावर बंदी घालण्याच्या प्रकरणावर चर्चा झाली.
भारतीय कुस्ती महासंघाचे महासचिव विनोद तोमर म्हणाले, भारतीय प्रशिक्षक स्वभावाने आणि आचरणाने सभ्य असतात. आम्ही युनाइटेड विश्व कुस्ती संस्थेला आश्वस्त केले आहे की, गैदरोव यांना तत्काळ त्यांच्या पदावरुन बरखास्त करण्यात येईल. गैदरोव यांना भारतात परत पाठवण्यात येईल. तिथून ते आपल्या मायदेशी बेलारूस येथे परततील, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने या प्रकरणाच्या सुनावणीनंतर गैदरोव यांचे एक्रिडेशन रद्द केले आहे. मात्र ते बंदीपासून थोडक्यात वाचले आहेत.