नवी दिल्ली : देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाही.त्यातच गेल्या २४ तासांत देशातील सर्वाधिक करोनाचे रुग्ण देशात आढळून आले असल्याचे दिसत आहे. एका दिवसात करोना रुग्ण संख्येत उच्चांकी वाढ झाली असून देशात पहिल्यांदाच करोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या पाच लाख ८ हजार ९५३ इतकी झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात १८ हजार ५५२ करोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३८४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधित बळींची संख्या १५ हजार ६८५ इतकी झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून १४ ते १५ हजारांनी वाढणारी करोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं १८ हजारांचा टप्पा ओलांडल्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आधिक आहे. एक लाख ९७ हजार ३८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दोन लाख ९५ हजार ८८१ जणांनी करोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारून ५७.४३ टक्के झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.