पुणे -महापालिका क्षेत्र वगळता केवळ ग्रामीण भागातील केशकर्तनालय दुकाने, स्पा, ब्युटी पार्लर येत्या 28 जूनपासून सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी विशिष्ट अटी आणि शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली. त्यामध्ये ही दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली.
केस कापणे, केसाला रंग देणे, वॅक्सिंग, थ्रेडिंग केवळ याला परवानगी असेल. त्वचे संबंधित सेवांना परवानगी नाही. कर्मचाऱ्यांनी हातमोजे, ऍप्रन, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. खुर्ची आणि जमिनीचा पृष्ठभाग वेळोवेळी निर्जंतूक करावे. विल्हेवाट लावता येतील असे टॉवेल आणि नॅपकीन वापरावे.
विल्हेवाट न लावता येण्याजोग्या उपकरणांचे प्रत्येक सेवेनंतर स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करावे. सेवा देणारा व सेवा घेणारा सोडून इतर व्यक्तींमध्ये 3 फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. नाका-तोंडाला मास्क आवश्यक आहे. दुकानामध्ये सॅनिटायझर, हॅन्डवॉश, साबण हे साहित्य ठेवणे बंधनकारक आहे.
ग्राहकांना अपॉईंटमेंट घेऊनच येण्यास सांगावे. प्रत्येक दुकानदारांनी, ग्राहकांनी वरील प्रमाणे घ्यावयाच्या दक्षतेबाबतची माहिती दुकानाच्या दर्शनी भागात ठळक स्वरुपात लावण्यात यावी. अटींचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करून दिलेली मुभा रद्द करण्यात येईल. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.