पॅरिस -जगभरात करोनाने घेतलेल्या बळींची संख्या 61 हजारांच्या पलिकडे पोहचली आहे. त्यातील युरोपमधील मृतांचे प्रमाण तीन-चतुर्थांश इतके आहे. त्या खंडात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 45 हजारांच्या आसपास आहे.
करोनाचा उद्रेक सर्वप्रथम चीनमध्ये झाला. मात्र, आता इतर देशांनी चीनला बाधित आणि मृतांच्या संख्येत खूपच मागे टाकले आहे. जगभरातील 11 लाख 41 हजारपेक्षा अधिक रूग्णांना करोनाची लागण झाली आहे. बाधितांचा विचार करता अमेरिकेतील संख्या जगात सर्वांधिक आहे. त्या देशातील करोनाबाधितांची संख्या लवकरच 3 लाखांचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेत 7 हजारहून अधिक रूग्ण मृत्युमुखी पडले आहेत.
जगातील सर्वांधिक मृतांची नोंद इटलीत झाली आहे. त्या देशात 14 हजारपेक्षा अधिक लोक दगावले आहेत. इटलीपाठोपाठ स्पेनमध्ये 11 हजारपेक्षा अधिक रूग्ण मृत्युमुखी पडले आहेत. मृतांच्या संख्येचा विचार करता फ्रान्सने 6 हजारांचा तर ब्रिटनने 4 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. इराणमध्ये 3 हजार 400 पेक्षा अधिक रूग्ण दगावले आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सर्वांधिक हानी झालेला चीन मृतांच्या संख्येत आता सातव्या स्थानी गेला आहे. चीनमध्ये 3 हजार 326 जणांचा बळी गेला आहे. जगातील 205 देश आणि प्रदेशांमध्ये करोना विषाणूचा फैलाव झाला आहे.