सासवड – करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी पुरंदर तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असतानाच तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, संघटना, बचत गट, गणेश मंडळे, विविध प्रतिष्ठान, राजकीय पक्ष यांनी देखील आपल्याला परीने करोनाविरोधात लढाईत सामाजिक भान जपत सहभाग घेतला आहे.नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, अन्नधान्य, कपडे, किराणाचे वाटप करण्याचे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे मोलमजुरी व रोजंदारी करणाऱ्या गोरगरिबांना हातभार लागला आहे. त्यामुळे गोरगरिबांची उपासमार थांबली आहे.
प्रशासनाच्या वतीने देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. यात सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे येत राखलेल्या सामाजिक भानामुळे पुरंदर तालुका करोनाविरोधात एकवटलेला आहे. अनेक सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. कारण वारंवार तालुक्यात अनेक ठिकाणी विविध संस्था, राजकीय पक्ष व संघटनांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. शिबिरास तालुक्यातून प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात हजारो पिशव्यांचे संकलन झाले आहे.
भटक्या विमुक्त जमातीतील विशेषतः नंदिवाले, वडार समाज, फासेपारधी, गोंधळी, पिंगळा, जोशी, बहुरूपी, कातकरी आदी समाजातील नागरिकांना मोफत मास्क, जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपासाठी अनेकांनी सढळ हाताने मदत करण्यास सुरूवात केल्याने प्रशासकीय यंत्रणेला हातभार लागला आहे. आपत्तीच्या काळात आज सर्व पुरंदरकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.