मुंबई – अभिनेत्री नंदिता पाटकर नुकतीच ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेतील तिची भूमिका अनेकांच्या पसंतीस पडली होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेनंतर आता नंदिता कोणत्या भूमिकेत पाहायला मिळणार याची अनेकांना उत्सुकता लागली होती. आता ती पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबाबत तिने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.
नंदिताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ‘बटर चिकन’ या लघुपटात ती झळकणार आहे. यात सुमन असे तिच्या भूमिकेचं नाव आहे. या लघुपटाच्या टीझरचा व्हिडीओ पोस्ट करत नंदिताने लिहीले आहे की, “घेऊन येतोय एक सिक्रेट रेसिपी टू रिलेशन…बटर चिकन.” तिने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. ‘बटर चिकन’ या लघुपटात नंदिताबरोबर अभिनेता सुशील इनामदार झळकणार आहे. 15 सप्टेंबरला हा लघुपट पॉकेट फिल्म्स या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान, ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने तब्बल साडे तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील विविध कलाकरांच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक घर निर्माण केले होते. सध्या या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र अजूनही या कलाकारांच्या या भूमिकांविषयी चर्चा होत असते. मात्र आता पुन्हा एकदा नंदिता प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.