विश्‍वकल्याण हेच वारकरी संप्रदायाचे ब्रीद

डॉ. विनोद गोरवाडकर

विश्‍वकल्याणाचे प्रमुख सूत्र केंद्रस्थानी ठेवून या साऱ्या संतांनी आपले इप्सित कार्य केल्याने वारकरी संप्रदायाने सर्वसामान्य मराठी माणसाच्या हृदयात कायमचे स्थान प्राप्त केले.

वारकरी संप्रदायाची स्थापना ज्ञानेश्‍वर-नामदेवांच्या आधी दीडशे-दोनशे वर्षे झाली असावी असे म्हटले जाते. ज्ञानेश्‍वरपूर्व कालखंडाचा साधनसामग्रीची अपूर्ण उपलब्धता असल्याने अभ्यास करणे काहीसे अवघड असले तरी

“द्वारकेहूनी आले जगजेठी। आले पुंडलिकाच्या भेटी। पावले सरळ गोमटी। बाळ सूर्यापरी” या एकनाथांच्या ओळी, “”भक्तामाजी अग्रगणी। पुंडलिक महामुनी। त्याच्या प्रसादे तरले। साधुसंत उद्धरिले”

या जनाबाईंच्या ओळी, “”भावाचे आळूके भुलले भक्तीसुखे। दिधले पुंडलिके साधुनिया।।”
या नामदेवाच्या ओळी, “”युगे अठ्ठावीस उभा हृषिकेश। पुंडलिक सौरस पुरवित”
या निवृत्तीनाथांच्या ओळी आणि “”कर्म धर्म करीता शिणली येता जाता। मग पुंडलिके अनंता प्रार्थीयले। येउनिया श्रीहरी भीमेच्या तिरी। सुदर्शनावरी पंढरी उभविली।” या ज्ञानदेवांच्या ओळी बघता भक्तराज पुंडलिकाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे जाणवते. त्यानंतरच्या काळात ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाचा तात्त्विक पाया घातला. नामदेवांनी त्याचा विस्तार करण्यासाठी कष्ट उपसले तर एकनाथांनी भगवतभक्तीचा भक्‍कम खांब आधार म्हणून उपलब्ध करून दिला आणि जगद्‌गुरू तुकोबाराय आपल्या अजोड कामगिरीमुळे वारकरी संप्रदायाचे कळस म्हणवले गेले. एकंदरीत वारकरी संप्रदायाचा हा सारा प्रवास त्या त्या वेळच्या संतांच्या अमौलिक योगदानामुळे महत्त्वपूर्ण ठरलेला दिसतो.

मराठी मनाची मशागत करणारा, सुशिक्षित-अशिक्षित, स्त्री-पुरुष, बाल-वृद्ध, खेडूत नागर आणि कोणत्याही जातीधर्मातील प्रत्येक व्यक्तीसमूहाच्या हृदयाची पकड घेणारा असा हा संप्रदाय ठरला आहे. विश्‍वकल्याणाचे प्रमुख सूत्र केंद्रस्थानी ठेवून या साऱ्या संतांनी आपले इप्सित कार्य केल्याने वारकरी संपदायाने सर्वसामान्य मराठी माणसाच्या हृदयात कायमचे स्थान प्राप्त केले.

वारकरी संप्रदायाने एक विशिष्ट आचारधर्म स्वीकारलेला आहे. या आचारधर्माची काही वैशिष्ट्ये आहेत, जी प्रत्येक वारकरी जीवाभावाने जपतो. ती सारी वैशिष्ट्ये बघितली की त्यातील सहजता लगेच लक्षात येते. प्रत्येक वारकरी गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावतो. श्री विठ्ठलाची भक्ती हे तर त्याचे आद्यकर्तव्य असते, श्री पांडुरंगाची पूजा, श्री ज्ञानदेवांचा हरिपाठ- श्रीज्ञानेश्‍वरी वाचन, तुळशीस पाणी घालणे ही वारकऱ्यांची नित्य संध्या असते. श्री ज्ञानेश्‍वरी, श्री तुकारामगाथा, श्री एकनाथी भागवत हे वारकऱ्याचे नित्य पठणाचे ग्रंथ होय. “रामकृष्णहरी’ हा वारकरी संप्रदायात नामस्मरणासाठी जपमंत्र आहे तर “पुंडलिक वरदे हरिविठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम हे घोषवाक्‍य आहे. सारे वारकरी भगवी पताका ही संप्रदायाचा ध्वज मानतात. टाळ, मृदुंग, वीणा ही वारकऱ्यांची वाद्ये होत. परस्परांसोबत वावरताना वारकरी संप्रदाय कधीही कुठलाही भेदभाव मानत नाही. सत्य, अहिंसा, सेवा, त्याग, दया, शांती या नीतीतत्त्वांना वारकरी संप्रदायात अतिशय महत्त्व आहे. एकादशीला उपवास करणे हे प्रत्येक वारकऱ्यासाठी व्रत असते. महिन्याच्या दोन्ही एकादशी काळजीपूर्वक व्रतस्थ भावनेने केल्या जातात.

“आता विश्‍वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे। तोषोनि मज द्यावे। पसायदान हे।।’ हे कमालीच्या आर्ततेने या भूवर वावरणाच्या समस्त प्राणिमात्रांसाठी मागितलेले वरदान म्हणजे ज्ञानदेवाच्या अलवार काळजाच्या ओल्या कोपऱ्यातला सर्वात करुणा आणि शांतीने ओथंबलेला कप्पा म्हणावा लागेल. ज्ञान-भक्ती आणि कर्म या त्रिसूत्रीचा वापर करून ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाची चौकट आखलेली आहे. ज्ञानेश्‍वरांनी सुसंगत व तर्कशुद्ध तत्त्वज्ञान सांगितले. नीतीची सूक्ष्म पद्धतीने मीमांसा करून आपले मत मांडले. धार्मिक अनुभवांचे योग्य मूल्यमापन केले आणि लोकजागृती करून समाजातील अठरापगड जातीधर्माच्या लोकांना एका सूत्राखाली एकत्रित केले. या अतिशय सुबद्ध पद्धतीने आचार-विचारांच्या चौकटीमुळे वारकरी संप्रदाय साऱ्यांना आपला न वाटल्यासच नवल!

हे सारे पाहिल्यानंतर वारकरी संप्रदायाच्या लोकप्रियेतेचे गुपित आपोआप उलगडल्यासारखे होते. भारतात अनेक भक्‍तिसंप्रदाय आले आणि गेले ; पण वारकरी संप्रदायाचा अनुभव करणारे वारकरी वाढतच चाललेले दिसतात. विठ्ठलाचा शब्दातील महिमा आणि ज्ञानदेव-तुकाराम या संतांची अजोड भक्ती हेच या पाठीमागील कारण आहे. यात शंका नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.