#CWC2019 : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर रोमहर्षक विजय

लीड्‌स – प्रतिस्पर्धी संघास आम्ही सहजासहजी विजयी होऊ देत नाही याचा प्रत्यय घडवित अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी पाकिस्तानला शेवटपर्यंत झुंजविले. तथापि पाकिस्तानने ही रोमहर्षक लढत तीन गडी व दोन चेंडू राखून जिंकली. या विजयासह पाकिस्तानने उपांत्य फेरीच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

अफगाणिस्तानने 50 षटकांत 9 बाद 227 धावा केल्या. विजयासाठी पाकिस्तानला 228 धावांचे माफक आव्हान होते. इमाम उल हक (36), बाबर आझम (45) व हॅरिस सोहेल (27) यांनी दमदार खेळ करूनही त्यांचा डाव 4 बाद 121 असा संकटात सापडला होता. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी अचूक मारा करीत त्यांच्या फलंदाजांवर चांगले नियंत्रण ठेवले होते. चुरशीच्या क्षणी कशी फलंदाजी करायची याचा परिपाठ घालत पाकिस्तानने विजय खेचून आणला. त्याचे श्रेय इमाद वासीम (नाबाद 49) व वहाब रियाझ (नाबाद 15) यांनी केलेल्या शैलीदार खेळास द्यावे लागेल.

पहिल्या फळीत रहमत शाह याने शैलीदार खेळ करीत 35 धावा जमविल्या. त्यानंतर असगर पठाण व इक्रम अलीखिली यांनी चौथ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. हेच त्यांच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य ठरले. असगर याने दमदार खेळ करीत 42 धावा केल्या. त्यामध्ये त्याने तीन चौकार व दोन षटकार मारले. इक्रमने 24 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक :

अफगाणिस्तान 50 षटकांत 9 बाद 227 (रहमत शाह 35, असगर अफगाण 42, नजीब उल्ला झाद्रान 42, शाहीन आफ्रिदी 4-47, वहाब रियाझ 2-29, इमाद वासीम 2-48) पाकिस्तान 49.4 षटकांत 7 बाद 230 (इमाम उल हक 36, बाबर आझम 45, हॅरिस सोहेल 27, इमाद वासीम नाबाद 49, मुजीब उर रहमान 2-34, मोहम्मद नबी 2-23)

Leave A Reply

Your email address will not be published.