विज्ञानविश्‍व : धन ऊर्जेच्या इमारतींचे विश्‍व

डॉ. मेघश्री दळवी
जग एका बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा तडाखा कमी करण्यासाठी कार्बन डायऑक्‍साइडचं प्रमाण मर्यादेत ठेवायचं आहे. त्यामुळे शाश्‍वत (सस्टेनेबल) तंत्रज्ञान आणि नूतनीकरणक्षम (रिन्यूएबल) ऊर्जा यांच्याशिवाय आता पर्याय नाही, याची जाणीव सर्वत्र होते आहे. ज्या तंत्रज्ञानाच्या अतिवापराने ही वेळ आली आहे, तेच तंत्रज्ञान यावर उपाय देणार आहे हेही विशेष.

ऊर्जेच्या बाबतीत घरं, इमारती, संकुलं, शहरं स्वयंपूर्ण करणे हा एक विचार हळूहळू रुजत आहे. ऊर्जेचा अनावश्‍यक वापर टाळायचा, भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळता वारा राहील अशी बांधणी करायची, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांची मदत घ्यायची, आणि सोबतीला स्मार्ट तंत्रज्ञान वापरून ऊर्जेचा वापर कमीत कमी ठेवायचा, या मार्गांनी ही स्वयंपूर्णतः आणता येते. अगदीच नाईलाजाने गरज पडेल तेवढीच ऊर्जा सार्वजनिक ग्रीडमधून घ्यायची अशा दृष्टीने आता स्वयंपूर्ण स्मार्ट इमारती उभ्या राहात आहेत.

याचा पुढचा टप्पा म्हणजे शून्य ऊर्जा इमारती, कुठलीही बाहेरची ऊर्जा न घेणाऱ्या. आणि यावर कडी म्हणजे उलट ग्रीडला ऊर्जा पुरवणारी इमारत. स्वत:ची गरज स्वत:च भागवणारी आणि इतरांसाठी ऊर्जा देऊ शकणारी धन ऊर्जेची इमारत. ही कल्पना नवी आहे आणि अशा तुरळक इमारती प्रत्यक्षात उभ्या राहिल्या आहेत. गेल्या महिन्यात नॉर्वे देशाने आजवरची सर्वात मोठी आणि सर्वात जास्त ऊर्जा देऊ करणारी धन ऊर्जा इमारत पूर्णत्वाला नेली आहे.

ब्रॅटोरकेया पॉवरहाऊस ही पॉवरहाऊस या नॉर्वेजियन कंपनीने उभारलेली इमारत ट्रोंडहाइम शहरात आहे. अठरा हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या आठ मजली इमारतीला वर्षाला अंदाजे 4 लाख 85 हजार किलोवॅट अवर इतकी ऊर्जा लागेल. ही सर्व ऊर्जा स्वत:च निर्माण करून प्रत्येक चौरस मीटरमागे सुमारे पाच किलोवॅट अवर इतकी अधिकची ऊर्जा ही इमारत ग्रीडला देऊ शकेल, असा अंदाज आहे.

धन ऊर्जा इमारती हाच ध्यास घेऊन ही कंपनी सुरू झाली आहे. लहान मॉंटेसरी शाळा ते व्यावसायिक इमारती, जिथे शक्‍य होईल तिथे त्यांनी आपलं तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं आहे. इमारतीच्या पृष्ठभागाला विशिष्ट उतार देऊन अधिकाधिक सोलर पॅनेल्स लावणे, आत ऊब राखण्यासाठी गरम हवा योग्य प्रकारे खेळवणे, अशा नावीन्यपूर्ण कल्पनांचा त्यात अंतर्भाव आहे. पॉवरहाऊस टेलिमार्क ही त्यांची आणखी एक इमारत सध्या दर चौरस मीटरमागे पावणेतीन किलोवॅट अवर ऊर्जा ग्रीडला पुरवते आहे. पाच, पावणेतीन, हे आकडे छोटे वाटले, तरी या छोट्या छोट्या

कृतींमधूनच आपण मोठी झेप घ्यायला तयार होत असतो.
मनात आणलं तर माणूस आपल्या चुका सुधारू शकतो. नवी जीवनशैली अंगीकारू शकतो आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर संकटांचा सामना करायला उभा ठाकू शकतो हेच अशा धन ऊर्जेच्या इमारती दाखवून देत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.