पॅरिस: जगभरात करोनाने घेतलेल्या बळींची संख्या 1 लाखाच्या जवळ जाऊन ठेपली आहे. त्या विषाणूचा संसर्ग जगातील 16 लाखांहून अधिक रूग्णांना झाला आहे. करोनाचा फैलाव आटोक्यात येण्याची चिन्हे तूर्त दृष्टीपथात नसल्याने संपूर्ण जगाला झुंजावे लागत आहे.
जगभरातील 210 देश आणि प्रदेशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. बाधितांचा विचार करता अमेरिकेतील संख्या सर्वांधिक आहे. त्या देशातील 4 लाख 688 हजारांहून अधिक नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 16 हजारांहून अधिक रूग्ण मृत्युमुखी पडले आहेत. जगातील सर्वांधिक बळींची नोंद इटलीत झाली आहे. त्या देशात करोनामुळे 18 हजारांहून अधिक नागरिक दगावले आहेत.
मृतांच्या संख्येत तिसऱ्या स्थानी असलेला स्पेन 16 हजारांच्या टप्प्याजवळ पोहचला आहे. त्याखालोखाल फ्रान्समध्ये 12 हजारांहून अधिक तर ब्रिटनमध्ये जवळपास 8 हजार मृतांची नोंद झाली आहे. इराणमधील मृतांनी याआधीच 4 हजारांची संख्या ओलांडली आहे. मागील वर्षाच्या अखेरीस चीनमध्ये सर्वप्रथम करोनाचा उद्रेक आढळला. त्यामुळे झालेल्या जीवितहानीने त्या देशात हाहाकार उडाला. मात्र, आता त्या देशातील करोना फैलाव आटोक्यात आल्याचे चित्र आहे. त्यातून तो देश जगभरातील मृतांच्या संख्येत सातव्या स्थानी घसरला आहे. चीनमधील मृतांची संख्या 3 हजार 336 इतकी आहे.