Ravindra Jadeja World Cup Record : रवींद्र जडेजाने रविवारी (12 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 मध्ये एक विशेष टप्पा गाठला. विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा तो भारतीय फिरकी गोलंदाज ठरला. हा विक्रम करण्यासाठी त्याला दोन विकेट्सची गरज होती, जी त्याने नेदरलँडविरुद्ध खेळताना सहज मिळवली.
नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात जडेजाने 9 षटके टाकली आणि 49 धावा देत दोन बळी घेतले. सर्वप्रथम त्याने मॅक्स ओ’डॉडला क्लिनबोल्ड केलं. ही विकेट मिळवून त्याने अनिल कुंबळे आणि युवराज सिंग यांच्या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेण्याच्या भारतीय फिरकी गोलंदाजाच्या विक्रमाशी बरोबरी केली. यानंतर त्याने व्हॅन डर मर्वेला पॅव्हेलियनमध्ये पाठवून दोन्ही दिग्गजांना मागे सोडले.
या वर्ल्ड कपमध्ये रवींद्र जडेजाच्या नावावर आता 16 विकेट्स आहेत. 18.25 च्या गोलंदाजी सरासरीने आणि 3.97 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने गोलंदाजी करताना त्याने 9 सामन्यांमध्ये या विकेट घेतल्या आहेत.
कुंबळेने 1996 मध्ये तर युवराजने 2011 मध्ये केला होता करिश्मा…
जडेजाच्या आधी भारतीय फिरकीपटूने एका विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळे आणि युवराज सिंग यांच्या नावावर होता. अनिल कुंबळेने 1996 च्या विश्वचषकात 15 विकेट घेतल्या होत्या. तर युवराज सिंगने 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये 15 विकेट घेतल्या होत्या. विशेष बाब म्हणजे हे दोन्ही विश्वचषक भारताने सह-यजमानपद भूषवले होते.
हा विक्रम आणखी मोठा करण्याची जडेजाला संधी..
भारतीय संघाला आता उपांत्य फेरीचा सामना खेळायचा आहे. यानंतर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली तर जडेजाचे आणखी दोन सामने होतील. येथेही जडेजा विकेट घेऊन आपला विक्रम आणखी मजबूत करू शकतो.
कुलदीप यादवच्या नावे 14 विकेट्स…
या विश्वचषकात जडेजासोबत कुलदीप यादवही शानदार गोलंदाजी करत आहे. त्याने आतापर्यंत 14 विकेट घेतल्या आहेत. शक्यतो, तोही उपांत्य फेरीच्या सामन्यात अनिल कुंबळे आणि युवराज सिंग यांचा विक्रम मागे टाकू शकतो.