यूजीन – भारताच्या एल्डहोस पॉलला पुरुषांच्या ट्रिपल जम्प प्रकारातील अंतिम फेरीत नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 25 वर्षीय पॉलने तीन प्रयत्नांत 16.79 मीटरची सर्वोत्कृष्ट उडी मारली आणि पहिल्या आठमध्ये स्थान मिळवण्यात तो अपयशी ठरला. त्याची मालिका 16.37, 16.79 आणि 13.86 मी राहिली.
तीन फेऱ्यांनंतर फक्त अव्वल आठ फिनिशर्सना आणखी तीन उड्या मिळतात. दरम्यान, पात्रता फेरीत 16.68 मी.च्या प्रयत्नात 12व्या स्थान मिळवित अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. पॉलने एप्रिलमध्ये फेडरेशन कपमध्ये सुवर्ण जिंकताना वैयक्तिक सर्वोत्तम 16.99 मीटरची नोंद केली होती.
ऑलिम्पिक चॅम्पियन पोर्तुगालच्या पेड्रो पिचार्डोने 17.95 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह सुवर्णपदक, तर बुर्किना फासोचा ह्यूग्स फॅब्रिस झांगो आणि चीनचा झू यामिंग यांनी अनुक्रमे 17.55 मीटर आणि 17.31 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नांसह दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.