नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय बॉक्सर अमित पंघल आणि लोव्हलिना बोर्गोहेन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुनरागमन करण्यास सज्ज झाले आहेत. तसेच विद्यमान विश्वविजेती निखत झरीनकडूनही सर्वांना दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
सध्या निखतने चांगली कामगिरी केली आहे. त्याने राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले. त्यानंतर प्रतिष्ठित स्ट्रॅन्डजा मेमोरियल स्पर्धा आणि जागतिक स्पर्धेतही सुवर्ण कामगिरी केली आहे. आता 26 वर्षीय निखतसमोर कडवे आव्हान असणार आहे. दुसरीकडे आसामच्या लोव्हलिनाला अनेक चढ-उताराचा सामना करावा लागला. गतवर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या लोव्हलिनाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षित आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा कांस्यपदक जिंकणारी लोव्हलिना आता राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकून ही निराशा दूर करण्याचा प्रयत्नात असेल.
पंघलने (51 किलो) अखेरचे राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तो ऑलिम्पिकमध्ये पदकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. परंतु उपउपांत्यपूर्व फेरीत त्याचे आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर पंघालने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेतला नाही. त्याने थायलंड ओपनमध्ये रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी पुनरागमन केले. आता राष्ट्रकुल स्पर्धेतही तो पदकाचा प्रबळ दावेदार मानला जात असून यावेळी तो अपेक्षांवर खरा उतरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल.
याशिवाय अनुभवी शिव थापा (63.5 किलो) देखील चमकदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे.ऑलिम्पियन आशिष कुमार (80 किलो), गतवेळचा कांस्यपदक विजेता मोहम्मद हुसामुद्दीन (57 किलो) आणि आशियाई सुवर्णपदक विजेता संजीतदेखील विजेतेपदाचे दावेदार आहेत.