तळेगाव दाभाडे – जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जनरल मोटर्स व ह्युंदाई कंपनीचे शिष्टमंडळ यांच्यासमवेत गुरुवारी (दि.12) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता आमदार सुनील शेळके व कामगार संघटनेचे पदाधिकारी मंत्रालयात ठाण मांडून बसले होते. मात्र, ही बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली. त्यामुळे आता ही बैठक नेमकी केव्हा होणार, याकडे कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे लक्ष लागले आहे.
तळेगाव दाभाडे एमआयडीसीतील जनरल मोटर्स कंपनीमधील कामगारांनी कुटुंबासहविविध मागण्यांसाठी मागील 15 दिवसांपासून ‘बेमुदत साखळी उपोषण’ सुरू केले आहे. जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांना ह्युंदाई मोटर्स कंपनीत सामावून घेण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी कंपनी कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सावंत यांची भेट घेत, हा प्रश्न सामोपचाराने सोडविण्याची मागणी केली.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुुरुवारी (दि.12) कामगारांच्या शिष्टमंडळासह जनरल मोटर्स व हुंदाइ मोटर्स अधिकारीदेखील उपस्थित राहणार होते. मात्र काही कारणास्तव ही बैठक होऊ शकली नाही.त्यामुळे कामगारांच्या शिष्टमंडळाला परत फिरावे लागले. त्यानंतर कामगार संघटनेने याप्रश्नी मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितलीआहे. आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून नियोजित भेटीची केव्हा तारिख कळविली जाते, याकडे कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे लक्ष लागले आहे.