वाल्हे परिसरातील मंदिरांसह घरोघरी घटस्थापना
वाल्हे – पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली. घटस्थापनेच्या निमित्ताने, पहाटे मंदिरातील उत्सव मूर्तींना दही, दुधाने स्नान घालून, अभिषेक करून, उत्सव मूर्तींना पोषाख घालण्यात आला व विधिवत पूजा करण्यात आली.
यावेळी वाल्हे गावचे मुलकी पाटील विष्णू पवार व गिरिष पवार, नारायण पवार यांच्या हस्ते, पुजारी सचिन आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. यावेळी, यावेळी, मंदिरात सुंदर अशी रांगोळी काढली होती. येणाऱ्या भाविकांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात घटस्थापने नंतर शिवकालीन भावनी माता मंदिरात मान्यवरांच्या हस्ते व पुजारी अनुराधा देविदास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घटस्थापना करण्यात आली.
यावेळी, पवार, भुजबळ, दुर्गाडे, कुंभार, मदने, पानसांडे, गायकवाड, राऊत आदी समाज बांधव उपस्थित होते. यानंतर, वाल्हे परिसरातील लक्ष्मीमाता, म्हस्कोबा, मसनेर, कडजाई माता, बाजारपेठेतील एकता प्रतिष्ठान, खवले आळी येथील शिवराय प्रतिष्ठान आदी ठिकाणी घटस्थापना करण्यात आली. व नंतर ग्रामस्थ घरातील घटस्थापना केली.
नवरात्र उत्सवानिमित्त वाल्हे परिसरात बहुतांश मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सायंकाळी श्री संत सावता महाराज मंदिरापासून नाथाची पालखी देऊळ वाड्यातून (कुंभार आळी) देवाची पालखी, ढोल, ताशा व सनईच्या गजरामध्ये गुलालाची मुक्त उधळण करीत ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात आणल्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.