– महापालिकेचा निर्णय
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी, चिंचवड व पिंपरी एमआयडीसी या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या व उद्योगात काम करणारा कामगार रेडझोन किंवा कंटेन्मेंट झोनमधून येत असला तरी त्यास महापालिकेच्या पूर्वपरवानगीची गरज लागणार नाही. कामगार आपल्या वाहनाने ये-जा करू शकतात. त्यामुळे त्यांना कोणतीही परवानगी न घेता काम करण्यास मुबा देण्यात आली आहे. याबाबत महापालिकेने आदेश काढला आहे. त्यामुळे सर्वच कामगारांना प्रवास करणे सुलभ झाले आहे. या निर्णयाचे उद्योग क्षेत्रातून स्वागत होत आहे.
दहा दिवसांचा लॉकडाऊन शुक्रवारी (दि.23) मध्यरात्री शिथिल झाला आहे. त्यामुळे महापालिकेने अनेक नियम व अटी शिथिल करीत कामगारांसह पथारी, हातगाडी विक्रेते, दुकानदार व व्यावसायिकांना दिलासा दिला आहे.
एमआयडीसीतील कंपन्या व उद्योग 100 टक्के कामगार क्षमतेसह सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेडझोन व कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्या कामगारांना महापालिकेच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता लागणार नाही.
खासगी कार्यालय व आयटी कंपनीत जास्तीत जास्त 50 टक्के मनुष्यबळ ठेवता येणार आहे. इतरांनी घरून काम करावे. शासकीय कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के मनुष्यबळ ठेवता येणार आहे. सर्व प्रकारचे मालवाहतुकीचे ट्रक यांना वाहतुकीसाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. आंतरजिल्हा, आंतरराज्य प्रवासी वाहतूक पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही.