पुणे – एकीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रत्येक विद्यार्थ्याला 10 कुटुंबांची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले असताना दुसरीकडे पुणे विद्यापीठात बांधकाम साइटवर अडकून पडलेल्या कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे.
पुणे विद्यापीठाच्या आवारात वसतीगृह, विभागांच्या इमारती, पाण्याची टाकी, क्रीडांगण यासह अनेक ठिकाणी बांधकाम सुरू होते. तेथे 100 पेक्षा जास्त मजूर काम करत होते. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरही हे कामगार तेथेच रहात आहेत. विद्यापीठ प्रशासनाला हे लक्षात आल्यानंतर त्यांनी विद्यापीठातील आरोग्य केंद्रात कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी करून घेतली. सर्वांची तब्येत व्यवस्थित आहे.
हे कामगार महिनाभरापासून कामाविना रहात आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडे असलेला किराणा संपत आला आहे. यातील सुमारे 20 कामगारांकडे तर सध्या खाण्यासाठी काहीच नाही. आम्हाला केवळ तांदूळ व डाळ दिली तर योग्य राहील, अशी मागणी या कामगारांनी विद्यापीठातील काही कर्मचाऱ्यांकडे केली आहे.
दरम्यान, यातील काहींना काम देण्याचा प्रयत्न आम्ही केला. विद्यापीठ आवारात राहणारे कामगार उपाशी राहणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.