पारनेर/नगर – शारदीय नवरात्रोत्सवात गेल्या पाच वर्षांपासून मतदारसंघातील महिलांना मोहटादेवीचे दर्शन घडवून त्यांना त्यांच्या घरापर्यंत परत पोहोचवणे हे राजकारण नव्हे, तर एक कार्यकर्ता म्हणून मी ही जबाबदारी पार पाडत आहे. या सर्व नियोजनात पारनेर आणि नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असून, कार्यकर्ता हीच माझी ताकद असल्याचे मत आ. नीलेश लंके यांनी व्यक्त केले.
नगर तालुक्यातील शहापूर, चांदबिबी महाल परिसरातील महिलांना मोहटादेवी दर्शन घडवले. या वेळी ते बोलत होते. या वेळी समारोपासाठी युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महेबूूब शेख उपस्थित होते. आ. लंके यांनी, नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून आठव्या माळेपर्यंत 1 लाख 26 हजार महिला भाविकांना मोहटादेवी दर्शन घडवण्याची ताकद तुम्हा माता-भगिनींच्या आशीर्वादाने मिळाल्याचे सांगितले.
महेबूब शेख म्हणाले की, आ. लंके हे आधुनिक युगातले श्रावणबाळ असून, ते प्रत्येक माता-भगिनींची आपल्या माता-पित्या प्रमाणे सेवा करत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काटेकोर नियोजनामुळे महिला भगिनींना देवी दर्शन होत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या नियोजनासाठी सरपंच प्रियंका लामखडे उद्योजक अजय लामखडे,अनुराधा कांडेकर, शिवा हेळकर, संजय जपकर, वसंत पवार, घनश्याम म्हस्के, नितीन कोतकर उपस्थित होते.
तीनशे बसची व्यवस्था
पहिल्या माळेपासून आठव्या माळेपर्यंत दर्शनासाठी आ. नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे तीनशे बसेसची व्यवस्था केली असून, सहभागी सर्व माता- भगिनींना फराळाची व्यवस्था केली आहे. याचे नियोजन आमदार लंके प्रतिष्ठानचे सर्व कायकर्ते करत आहेत.