पुणे – मेट्रोच्या 10 मीटर उंच पोलवरुन पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना ससून रस्त्यावरील बंडगार्डन मेट्रो स्टेशन येथे घडली. याप्रकरणी साईट इन्चार्जवर कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अभिनंदनकुमार नंदकिशोर रमाणी (23,रा.नागपुर चाळ, येरवडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक मनिषा टुले यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार विनयकुमार सिंग(42,रा.टिंगणेनगर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ससून रस्त्यावर न्यू सुजाता हौसिंग सोसायटी समोर मेट्रो स्टेशनचे काम सुरु आहे. येथे पिलर क्रमांक आठवर 10 मीटर उंचीवर रमाणी हा नटबोल्ट बसवण्याचे काम करत होता. येथे कामगार काम करत असताना सुरक्षेच्या दृष्टीने नेट अथवा इतर कोणतीही साधने पुरवण्यात आली नव्हती.
काम करत असतानाच रमाणी यांचा तोल जाऊन रमाणी 10 मीटर उंचीवरुन खाली पडले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांचा मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी साईट इन्चार्ज सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेंडगे करत आहेत.