नवी दिल्ली – भारताच्या अदिती अशोकला चांगल्या कामगिरीनंतरही काहीशा अपयशामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील गोल्फमधील पदकाने हुलकावणी दिली. बेंगळूरुच्या अदितीला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.
मात्र, या अपयशाने खचून न जाता कामगिरीत व सरावात दुप्पट मेहनत घेणार असून आगामी मोसमातील स्पर्धांमध्ये सरस कामगिरी करणार आहे. तसेच ज्या पदकाने टोकियोत हुलकावणी दिली ते पॅरिसमध्ये मिळवणार, असा विश्वास भारताची अव्वल महिला गोल्फपटू अदिती अशोक हिने व्यक्त केला आहे.
अदितीने यापूर्वीच्या तिन्ही फेऱ्यांमध्ये दुसरे स्थान कायम राखण्यात यश मिळवले. मात्र, अगदी थोडक्यात तिचे पदक हुकले. 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये अदितीने 41 वा क्रमांक मिळवला होता. या वेळी मात्र तिने कामगिरी उंचावत किमान चौथे स्थान मिळवले.
टोकियोत पदक मिळवण्यात अपयशी ठरल्यामुळे निराश झाले असले तरी पॅरिसमध्ये निश्चितच देशाला पदक मिळवून देइन, असेही तिने सांगितले.