उपचारासाठी वायसीएम हॉस्पिटलला हलवले ः प्राथमिक अहवालात निमोनियाची लक्षणे
नारायणगाव-जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे करोना संशयित महिला रविवारी (दि. 29) आढळली आहे. या महिलेला नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून वायसीएम हॉस्पिटल पिंपरी चिंचवड येथे रात्री 12 वाजता पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
नारायणगाव येथील या 39 वर्षीय महिलेला सर्दी, खोकला, ताप आणि श्वासोश्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती मिळताच आमदार अतुल बेनके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घोडे यांनी सूचना केल्यानुसार वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशुतोष बोलीज यांनी या महिलेची तपासणी केली. या अगोदर या महिलेस खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी केली.
या तपासणीमध्ये या महिलेला निमोनियाची लक्षणे दिसून आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, डॉ. आशुतोष बोलीज, सरपंच योगेश पाटे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्या संयुक्तीक निर्णयाने या महिलेस पुढील तपासण्यांसाठी रविारी (दि. 29) रात्री 12 वाजता पिंपरी चिंचवड येथील वायसीएम हॉस्पिटल येथे हलविण्यात आले.
या महिलेला दीड वर्षापासून खोकला, सर्दीचा त्रास आहे. 8 मार्चपर्यंत तिने आपल्याकडे उपचार घेतले. नंतर एका एमडी डॉक्टरकडे आणि सध्या दोन दिवसांपासून दुसऱ्या एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेत होती. एक्सरे रिपोर्टमध्ये महिलेला निमोनियाची लक्षणे दिसून आल्याने धोका नको आणि त्या महिलेच्या पुढील तपासण्यासाठी त्यांना वायसीएम हॉस्पिटल येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- 100 टक्के बंद पाळणार
लॉकडाऊन असताना नागरिक आरोग्याची काळजी घेत नाहीत. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाहेर पडत आहेत, म्हणून नारायणगाव व वारूळवाडी ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन यांनी संयुक्तकरीत्या 1 एप्रिल 2020 पर्यंत हॉस्पिटल, मेडिकल आणि दुध विक्री केंद्रे वगळता सर्व अत्यावश्यक सेवा व सर्व बंद दुकाने बंद ठेवून 100 टक्के जनता कर्फ्यू राबविण्यात येणार आहे. 2 एप्रिलपर्यंत सकाळी 7 ते 8 आणि संध्याकाळी 7 ते 7.30पर्यंत दूधविक्री सुरु राहणार आहे, अशी माहिती नारायणगावचे सरपंच योगेश पाटे आणि वारूळवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन वारूळे यांनी दिली.