रुग्णाच्या संपर्कातील लोकांना नायडू रुग्णालयात पाठवले
ओतूर -जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथील एकजण करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामुळे परिसरातील वातावरण गंभीर झाले आहे. त्याला मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचाराकामी दाखल केल्याची माहिती ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. यादव शेखरे यांनी दिली.
17 मार्चला हा रुग्ण मुंबईवरून गावी आला होता. या दरम्यान तो ओतूर आणि परिसरात काही दुकानांमध्ये, भाजीबाजार आणि अशा अनेक ठिकाणी त्याचा व कुटुंबीयांचा संपर्क आला असल्याचे खात्रीलायक माहीती आहे. कारण हा रुग्ण थंडी, ताप, डोकेदुखीकरिता ओतूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आला होता. त्याच्यावर उपचारदेखील करण्यात आले व त्याची रक्त तपासणी करून त्यास पाठवून दिले; मात्र हा रुग्ण नंतर एका खासगी रुग्णालयात देखील उपचारासाठी गेला होता. येथून तो थेट पुन्हा मुंबईला गेला. तेथे त्याची तपासणी केली असता तो करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दि. 17 ते 20 दरम्यान ज्या-ज्या लोकांसोबत या रुग्णाचा संपर्क आला आहे, त्या सर्व लोकांमध्ये तपासणी केलेले डॉक्टर, नर्स, लॅब असिस्टंट यांना पुणे येथे नायडू रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर संपर्कात आलेले डिंगोरे येथील आठ जण, उदापूरचे दोन जण असे सर्वजण पुढील उपचार घेत आहेत. दरम्यान उदापूरच्या पाच लोकांना होम कॉरंटाईनचा सक्त सल्ला देण्यात आला आहे.
- स्वतःहून होम क्वारंटाइन व्हा
ज्या-ज्या ठिकाणी करोना बाधित व्यक्तीचा संपर्क आला, ज्या किराणा, मेडिकल, भाजीपाला दुकानांमध्ये तो गेला असेल. फिरत असताना तो व त्याचे कुटुंबातील सदस्य ज्यांच्या संपर्कात या ना त्या कारणाने आली असतील, अशांनी स्वतःहून काळजी घेण्याची व होम क्वारंटाइन होण्याची नितांत गरज आहे. - तीन किमी परिसर सील
या घटनेमुळे जनतेने घाबरून न जाता आपापल्या घरातच बसावे व सूचनांचे काटेकोर पालन करावे. या करोना व्हायरसविषयी अजूनही काही ठिकाणी गांभीर्य नसल्याने शासन आणि प्रशासन यांनी कठोर पावले उचलायचे ठरविले आहे. डिंगोरेच्या तीन किलोमीटर परिसरात संपूर्ण संचारबंदी करण्यात आली असल्याची माहिती हाती आली आहे. - जनतेने स्वतः होम क्वारंटाइन व्हा. प्रशासनाच्या संपूर्ण सुचनांचे पालन करा. आपली स्वतःची व इतरांचीही काळजी घ्या. कामाशिवाय विनाकारण फिरू नका. घाबरून जाऊ नका सूचनांचे पालन करून आपण करोनावर मात करणार आहोत.
-अतुल बेनके, आमदार जुन्नर