पुणे – राज्य परिवहन महामंडळातील एस.टी. सेवेत महिला चालकांचे काम करणार असल्याने इतरांसाठी प्रेरणादायी आहे. देशातील प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर असून स्वत:च्या कर्तृत्वावर महिला सक्षमपणे पावले टाकत असल्याचे गौरोवोद्गार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी शुक्रवारी काढले.
एस.टी. महामंडळाने एस.टी. बसच्या चालक प्रशिक्षणासाठी 163 महिलांची निवड केली आहे. या महिलांच्या प्रशिक्षणाचा प्रारंभ प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार माधुरी मिसाळ, माधव काळे, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. या प्रसंगी प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एसटी महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
पाटील म्हणाल्या, एस.टी. सेवेत महिलांचा चालक म्हणून समावेश झाल्याने प्रवाशांची सुरक्षा महिला करणार आहेत. तसेच या आगोदर यवतमाळमधील आदिवासी महिलांचा एस.टी. सेवेत चालकपदी समावेश करून आदिवासी महिलांना मुख्य प्रवाहात आणले आहे.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, एस.टी. महामंडळातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 9 महिन्यांची प्रसुती रजा देण्याचा निर्णय स्तुत्य आहे. एस.टी चालक असणाऱ्या महिला स्वत:च्या कर्तुत्वावर उभ्या आहेत.
महिलांना स्वरक्षणासाठी शस्त्र परवाने द्या
एस.टी. सेवेत चालकपदी महिला येणार असल्याने रात्री-अपरात्री परगावी गाड्या चालवाव्या लागणार आहेत. यामुळे चालक महिलांच्या सुरक्षितता व स्वरक्षणासाठी महिलांना शस्त्रास्त्राचे परवाने देण्याची, मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली.
महिला चालक मातृत्वाच्या भावनेने बस चालवून एसटीला प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करतील. मातृत्व, ममत्व आणि कतृत्वातून या महिला उद्याच्या आदर्श ठरतील. चालकपदी महिलांचा समावेश करून एस.टी.ने सकारात्मकतेचे पाऊल पुढे टाकले आहे. तसेच, महिलांच्या स्वातंत्र्यासाठी महामंडळ नेहमीच प्रयत्न करत आहे.
– दिवाकर रावते, परिवहन मंत्री