पुणे – मुंबईतील रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत महिला सुरक्षितपणे वावरत असतात. तशाच प्रकारे पुण्यातील महिलाही सुरक्षितपणे वावरतील असा कायदा व सुव्यवस्थेचा धाक राखू, असे आश्वासन नवनिर्वाचित पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणेकरांना दिले आहे.
गुप्ता यांनी मागील रविवारी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. यानंतर ते प्रत्येक पोलीस ठाण्यास भेट देत आहेत. पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच सर्वसामान्य तक्रारदारांचे म्हणणेही समजून घेतले.
शहरातील गुन्हेगारी, कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न आदींचा आढावा घेतला. ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. शहरातील वाटमारीच्या घटना व इतर घटनांच्या पार्श्वभूमीवर आढावाही घेतला. मुंबई शहराप्रमाणे पुणे शहराचे “नाइट लाइफ’ नाही, मात्र शहराचा विकास वेगाने होत असताना येथील “नाइट लाइफ’ही सुरक्षित असावी, असे त्यांनी म्हटले आहे.
सावधान… सर्वेक्षणाबाबत इशारा
करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम सुरू केली आहे. यामध्ये प्रशासनाने नेमलेले कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करत आहेत. या कर्मचाऱ्यांबद्दल नागरिकांच्या मनात अनेकदा शंका उपस्थित होत आहेत. तर काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती याचा फायदा उठवण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना जर घरी तपासणीसाठी आलेल्या व्यक्तींबद्दल शंका आली तर त्यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करावा. यासंदर्भात दोन तक्रारी कानावर आल्या आहेत. बनावट ओळखपत्राचा वापरही केला जाऊ शकतो, असेही गुप्ता म्हणाले.