लग्नाचे आमीष दाखवून प्रिन्स हॅरीकडून फसवणूक; वकील महिलेची न्यायालयात धाव

चंदीगड – ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरी यांच्या विरोधात एका महिलेने पंजाब- हरियाणा कोर्टात धाव घेतली आहे. प्रिन्स हॅरी यांनी आपल्याला लग्नाचे वचन दिले होते. आता ते लग्न करण्यास नकार देत असून त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात यावे, अशी मागणी या महिलेन याचिकेद्वारे केली आहे. कोर्टाने या महिलेची याचिका फेटाळून लावली आहे.

या महिलेच्या या याचिकेवर कोर्टानेही मिश्‍किल टिप्पणी केली आहे. प्रिन्स हॅरी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पंजाबमधील कोणत्या तरी गावातील सायबर कॅफेत बसले असण्याची शक्‍यता आहे, अशी मिश्‍किल टिप्पणी करतानाच ही याचिका म्हणजे दिवसाढवळ्या पाहण्यात येत असलेले स्वप्न आहे,असे न्यायालयाने म्हटले आहे.

विशेष म्हणजे याचिका दाखल करणारी महिला व्यवसायाने वकील आहे. तिच्या विनंतीवर कोर्टाने ही याचिका सुनावणीसाठी घेतली. परंतु, ही याचिका तथ्यहीन असल्याचे सांगत याचिका फेटाळून लावली. प्रिन्स हॅरी यांनी लवकरात लवकर लग्न वचन दिले होते. आता ते विवाह करण्यास नकार देत आहेत असा या महिलेचा दावा आहे.

तुम्ही सोशल मीडियावरील फेक गोष्टींना सत्य मानत आहात, असे कोर्टाने म्हटले आहे. या महिलेने तिच्या अर्जात काही ई-मेलचा उल्लेखही केला आहे. प्रिन्स हॅरी यांनी हे मेल आपल्याला पाठवले होते, असा दावा तिने केला आहे. त्यावर या प्रकरणात आम्ही आमची सहानुभूती दाखवू शकतो, असं कोर्टाने म्हटलं आहे. अर्जाचा ड्राफ्ट योग्य पद्धतीने करण्यात आलेला नाही. खोट्या आईडीद्वारे अनेक अकाऊंट्‌स बनवून अशाप्रकारचे मेसेज केले जातात, असे कोर्टाने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.