मॉस्को – रशियाने युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाचा देश असलेल्या युक्रेनला चारही बाजूंनी घेरले असून रशियाचे हजारो रणगाडे आणि क्षेपणास्त्र युक्रेनभोवती तैनात करण्यात आले आहेत. सातत्याने बिघडत असलेल्या परिस्थितीमुळे युरोपमध्ये सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जर्मनीने रशियाला सैन्य मागे घेण्याचे आवाहन करुनही रशियाने आपले सैन्य मागे घेतलेले नाही. रशियाची आक्रमक भूमिका पाहून अमेरिकेने देखील यात उडी घेतली आहे. अमेरिका पुढील आठवड्यात काळ्या समुद्रात आपल्या दोन युद्धनौका पाठवण्याची तयारी करत असून त्यामुळे एकूणच जागतिक महायुद्धासारखी परिस्थिती तयार झाली आहे.
रशियाने पूर्व डोनबासच्या वोरोनेक आणि क्रासनोडरमध्ये रणगाडे तैनात केले आहेत. क्रेमलिन प्रवक्ता दमित्री पेस्कोव म्हणाले, यूक्रेनमध्ये परिस्थिती खूप अस्थिर आहे. यामुळे युद्धाचा धोका वाढला आहे. मात्र आपण काहीही चुकीचे करत नसल्याचा दावा रशियाने केला आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर जेलेंस्की यांनीही बदलत्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकूणच परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, युक्रेनने रशियाच्या कोणत्याही नागरिकावर अत्याचार केला तर ती त्या देशाच्या अंताची सुरूवात असल्याचा इशारा रशियाच्या राष्ट्रपतींच्या निकटवर्तीयांनी दिला आहे. रशियाचे राष्ट्रपती प्रशासनाचे उप प्रमुख दमित्री कोजाक म्हणाले, रशिया पहिल्यांदा हल्ला करणार नाही. मात्र, युक्रेनने रशियाविरोधात पाऊल उचलले तर युक्रेनच्या पायावर नाही तर तोंडावर गोळ्या झाडल्या जातील.
दरम्यान, अमेरिकेने आपले युद्ध जहाज तुर्कीच्या हद्दीतून पाठवण्यासाठी परवानगी मागितली आहे. बोसफोरसच्या मार्गे अमेरिका हे जहाज पाठवणार आहे. तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे. अमेरिकेची जहाजे 14 आणि 15 एप्रिलला तुर्कीतून जातील. नुकतेच युक्रेनने नाटोमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न वाढवले आहेत. त्याला अमेरिकेने पाठिंबा दिलाय. यावर रशियाने नाराजी व्यक्त केलीय