रायगड – मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न हा सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरला असतानाच याच महामार्गावर प्रवास करणाऱ्या एसटीमध्येच एका महिलेची प्रसूती झाल्याचा प्रकार घडला आहे.
पनवेल-महाड या एसटी बसवर ड्युटी करणाऱ्या चालक वाहकांनी समय सूचकता दाखवून तात्काळ या महिलेला कोलाड आंबेवाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
तेथे उपचार केल्यावर बाळाची प्रकृती मात्र नाजूक असल्याने या महिलेला अलिबाग येथील उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले आहे. हा प्रकार 9 सप्टेंबर रोजी रविवारी सायंकाळी उशिरा घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यात महाड एसटी आगारातील चालक गोविंद जाधव आणि वाहक नामदेव पवार हे आपली ड्युटी क्रमांक 47/48 करीत असताना एका प्रवासी महिलेस रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बस आदळत असल्याने प्रसूती वेदना सुरू झाल्या. मूळ रोहा आगाराच्या असलेल्या या बसमध्ये त्या महिलेची प्रसूती झाली.
आपल्या कर्तव्यावर तत्पर असलेले चालक जाधव आणि वाहक पवार क्षणाचाही विलंब न लावता या महिलेला कोलाड येथील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. बाळ आणि आई दोघेही सुखरूप दवाखान्यात पोहोचल्याने बसमधील अन्य प्रवाशांनीही त्यांचे आभार मानले.