साऊथ आफ्रिकेतील महिलेने एकाच वेळी १० बालकांना जन्म दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकले होते. समाजमाध्यमांवरही याबाबत जोरदार चर्चा सुरु होती व सर्वांनीच याबाबत आश्चर्य देखील व्यक्त केलेलं. मात्र हे वृत्त खोटं असल्याची माहिती आता समोर येतीये.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोसीयम सिथोले या ३७ वर्षीय महिलेने आपण १० अपत्यांना जन्म दिला असल्याचा दावा केला होता. आता याबाबत येथील स्थानिक प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला असून अशा घटनेची गौतेंग प्रांतातील कोणत्याही रुग्णालयात नोंद नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
एवढंच काय तर गोसीयम सिथोले नामक या महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता ती दरम्यानच्या काळात गर्भवती नसल्याचं देखील समोर आलंय. सिथोले यांनी हे खोटं पसरवण्यामागे नेमकं कारण होत? याबाबतचा खुलासा जरी करण्यात आला नसला तरी स्थानिक प्रशासनाने त्यांना मानसिक आरोग्य कायद्याखाली निरीक्षणात ठेवलं असल्याची माहिती दिली आहे.
नेमकं काय घडलं?
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार,
गतवर्षी डिसेंबर महिन्यात सिथोले आणि त्यांचे जोडीदार टेबोहो सोटेत्सी यांची एका चर्चमध्ये प्रिटोरिया न्यूजचे मुख्य संपादक पीट राम्पेडी यांच्यासोबत ओळख झाली. यानंतर मे महिन्यामध्ये राम्पेडी यांनी त्यांची एक व्हडिओ मुलाखत घेतली. यावेळी सिथोले या गर्भवती असल्याचं दिसत होत. यावेळी जोडप्याने त्यांना आम्हाला आठ अपत्य होतील असा अंदाज वर्तवला होता.
नंतर ८ जून रोजी प्रिटोरिया न्यूजने सोटेत्सी यांच्या हवाल्याने या जोडप्याला १० अपत्य झाल्याचे वृत्त दिले. सोटेत्सी यांनी याबाबत माहिती देताना, त्यांना ही माहिती सिथोले यांनी मेसेजद्वारे दिल्याचं सांगितलं. तसेच करोना परिस्थितीमुळे आपण रुग्णालयात जाऊ शकलो नाही असेही ते म्हणाले.
मात्र सिथोले यांना कोणत्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय याबाबत विचारलं असता ते सांगू शकले नाहीत. यामुळे त्यांच्या विश्वसार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यानंतर स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी याचा मागोवा घेतला असता सिथोले या एका रुग्णालयामध्ये काही चाचण्या करण्यासाठी दाखल असल्याचं निदर्शनास आलं.
दरम्यान, १० मुलांना जन्म दिल्याबाबतचे वृत्त सर्वप्रथम प्रिटोरिया न्यूज या वृत्तसंकेतस्थळाने दिले होते. आपल्या वृत्ताबाबत ते अद्यापही ठाम असून स्थानिक प्रशासन व आरोग्य विभाग याबाबतीत झालेले दुर्लक्ष लपवण्यासाठी हे करत असल्याचा आरोप केला.