- आढावा बैठकीत पुन्हा मुद्दा उपस्थित
- पिंपरी-चिंचवड शहराचे नाव समाविष्ट करण्याची मागणी
पिंपरी – मेट्रो, स्मार्ट सिटी तसेच पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्नांबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीत देखील मेट्रोच्या नावाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करण्यात आला. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पुणे मेट्रो असे नाव न ठेवता पिंपरी-चिंचवडचे नाव देखील समाविष्ट करण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरातील सुरू असलेले मेट्रोचे काम तातडीने पूर्णं करावे. तसेच महापालिका आणि मेट्रो यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार मेट्रोने फूटपाथ व दुभाजकांचे सुशोभीकरण, रस्त्यांची दुरुस्ती आदी कामे तातडीने पूर्ण करून देण्याच्या सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी मेट्रो प्रशासनाला दिल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या बैठकीस महापौर माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती ऍड. नितीन लांडगे, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, सागर आंगोळकर, नगरसेवक शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे व महापालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.
पुणे मेट्रोचे पिंपरी-पुणे मेट्रो नामकरण करण्याबाबत पिंपरी चिंचवड महापालिका महासभेने ठराव मंजूर करून मेट्रोला दिला आहे, त्याची कार्यवाही मेट्रो प्रशासनाने लवकर करावी. पिंपरी-चिंचवड ते निगडी उन्नत मेट्रो प्रकल्पास अर्थसंकल्पीय तरतूद करणे, हिंजवडी-चाकण नवीन मेट्रो कॉरीडोरची प्रगती, पिंपरी-निगडी मेट्रो मार्गीका, पिंपरी-शिवाजीनगर मेट्रोचे पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील रस्त्यालगतचे सुशोभिकरण करण्यात यावे. मेट्रोच्या पोलवर वारकरी संप्रदायातील छायाचित्रे रेखाटणे, पिंपरी ते हॅरीस ब्रिज मेट्रो स्टेशनला थोर पुरुषांची नावे देणे आदी विषयांबाबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना विविध सूचना दिल्या.