पिंपरी, (प्रतिनिधी) – एका औषध विक्रेत्याने दुकानाशेजारी असलेल्या डॉक्टर महिलेकडे नफ्यातील 50 टक्के रक्कम मागितली. आपल्यामुळे डॉक्टरचा धंदा होत असल्याचे त्याचे म्हणणे होते. त्यावरून डॉक्टर महिलेसोबत वाद घालत तिच्या पतीला मारहाण केली. तसेच डॉक्टर महिलेचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 16) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडली.
ईश्वर नाईक (रा. चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी डॉक्टर महिलेने महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करत असताना शेजारी असलेल्या मेडिकल दुकानदार महिलेच्या पतीने हॉस्पिटलमध्ये येऊन फिर्यादी सोबत वाद घातला. माझ्यामुळे तुमचा धंदा होत आहे.
मला 50 टक्के नफा द्या. तुमच्यामुळे माझा तोटा होत आहे, असे आरोपीने म्हटले. तसेच डॉक्टर महिलेला अश्लील बोलून तसेच गैरवर्तन करून महिला डॉक्टरचा विनयभंग केला. त्यानंतर डॉक्टर महिलेने तिच्या पतीला बोलावले असता आरोपीने त्यांनाही मारहाण केली.