इस्लामाबाद – पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो यांच्या धाकट्या कन्या आसिफा भुट्टो या देखील सक्रीय राजकारणामध्ये उतरणार आहेत. वडील आसिफ अली झरदारी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या संसदेच्या सिंध प्रांतातील जागेरील पोटनिवडणूक त्या लढवणार आहेत.
काही काळापासून ३१ वर्षीय असिफा या राजकारणामध्ये सक्रीय आहेत. मात्र पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह अध्यक्ष आणि वडील आसिफ अली झरदारी यांनी त्यांना संसदीय निवडणुकांपासून दूरच ठेवले होते. झरदारी यांची पाकिस्तानचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांनी आसिफा भुट्टो यांची देशाच्या फर्स्ट लेडी म्हणून नियुक्ती केली. सर्वसाधारणपणे फर्स्ट लेडी हे मानाचे स्थान अध्यक्षांच्या पत्नीला दिले जाते.
मात्र आता आसिफा भुट्टो झरदारी यांनी पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पोटनिवडणिकीसाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. सिंध प्रांतातील शहीद बेनझीरबाद जिल्ह्यातील संसदेच्या २०७ क्रमांकाच्या मतदारसंघातून त्या ही पोटनिवडणूक लढवणार आहेत. त्यांचे वडील आसिफ अली झरदारी हे याच मतदारसंघातून निवडून गेले होते. मात्र अध्यक्ष झाल्यावर त्यांनी या जागेच्या संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
आसिफा आणि त्यांच्या आई बेनझीर भुट्टो यांच्यात खूप साधर्म्य आहे. बेनझीर भुट्टो यांची २००७ मध्ये रावळपिंडीत आत्मघातकी बॉम्बस्फोटात हत्या झाली होती. त्यावेळी आसिफा किशोरवयीन होत्या आणि आईच्या हत्येचा त्यांच्या बालमनावर खूप खोलवर परिणाम झाला होता. थोरली भावंडे बख्तावर आणि बिलावल यांच्यापेक्षा आसिफा यांच्या मनावर हा परिणाम खूप दीर्घकाळापर्यंत टिकला होता. बिलावल भुट्टो पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पीपीपी पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते जरी पक्षाचे अध्यक्ष झाले असले, तरी आसिफा याच बेनझीर यांच्या राजकीय वारसदार मानल्या जात आहेत.
पाकिस्तानमधील संसदीय आणि प्रांतीय पोटनिवडणुका २१ एप्रिलला होणार आहेत. आसिफा यांचा विजय निश्चित मानला जात असून आता त्या संसदेत सक्रीय होणार आहेत. त्याशिवाय पक्ष संघटना मजबूत करण्यावरही त्यांचा भर असणार आहे.