भिगवण-भिगवण स्टेशन (ता. इंदापूर) येथील महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कुंभार यांनी माहिती दिली आहे. अडीच महिन्यांपूर्वी भिगवण स्टेशन येथीलच एका 60 वर्षीय महिलेचा करोनामुळे मुत्यू झाला होता. (दि.28) एप्रिल रोजी भिगवण स्टेशन येथील 60 वर्षीय महिला बाधित झाली होती.
पुणे येथे उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एका महिलेस लागण होऊन महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ही महिला दमा व इतर आजाराची रुग्ण होती.
चार दिवसांपूर्वी आजारी पडल्यामुळे महिलेस बारामती येथील शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल केले होते. त्यानंतर महिलेची स्थिती बिघडल्यामुळे शुक्रवारी (दि.10) महिलेची करोनाची चाचणी करण्यात आली.
दरम्यान, शनिवारी (दि.11) सकाळी महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
करोनामुळे भिगवण स्टेशन येथील दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महिलेच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे व त्यांना क्वारंटाइन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून भिगवण स्टेशन येथे नाकाबंदी करण्यात
आली आहे.
भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने म्हणाले, भिगवण स्टेशन येथील महिलेचा करोनामुळे म्ृत्यू झाला आहे. प्रशासनाचे पुढील आदेशानुसार भिगवण स्टेशन परिसर सील केला आहे. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे. प्रशासनास सहकार्य करावे.